पुणे : कोविड (Covid) आणि डेंग्यूची लागण झालेल्या एका 60 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरुवातीला कोविड आणि डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे या 60 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात या महिन्याच्या सुरुवातीला दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण नंतर एनआयव्हीच्या (NIV) त्याच्या टेस्ट सॅम्पलमध्ये त्याला चिकुनगुन्या झाल्याचेही उघड झाले. एकापेक्षा जास्त विषाणूंचा संसर्ग असामान्य आहे, परंतु पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या महिन्यांत अशाप्रकारच्या संक्रमणाची शक्यता वाढली आहे. या 60 वर्षीय व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, की त्या व्यक्तीमध्ये कोविड आणि डेंग्यूसारखी लक्षणे होती. 29 जून रोजी दाखल करताना त्यांना थंडी वाजून ताप आला होता आणि प्लेटलेट्सची संख्या खूपच कमी होती.
नंतर रुग्णाला श्वास घेण्यास गंभीर त्रास झाला. त्यातच कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह झाली. डेंग्यू, रॅपिड अँटीजेन चाचणीही पॉझिटिव्ह आली. परंतु डेंग्यूची पुष्टी करण्यासाठी, आम्ही त्याच्या रक्ताचा नमुना एनआयव्हीकडे पाठवला. दुर्दैवाने, दोन दिवसांनंतर, 3 जुलै रोजी, त्या व्यक्तीचा कार्डियोजेनिक शॉक आणि संबंधित गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला. 28 जुलै रोजी, आम्ही एनआयव्हीकडून अहवाल गोळा केला तेव्हा त्यात दिसून आले, की डेंग्यू आणि चिकुनगुन्या ही त्या व्यक्तीला झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टर पुढे म्हणाले, की तिहेरी संसर्गाची ही केस हेच सिद्ध करते, की डॉक्टरांना एकाधिक विषाणूजन्य रोगांचे सहअस्तित्व चुकणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. विशेषत: या हंगामात, जेव्हा विविध विषाणू एकत्रितपणे फिरत असतात. वृद्ध व्यक्तीला मधुमेह, हृदयविकार, बिघडलेले मूत्रपिंड कार्य आणि अकार्यक्षम थायरॉइड किंवा हायपोथायरॉइडीझम यासह काही समस्या होत्या. लक्षणे स्पष्ट दिसत नसल्यामुळे डेंग्यू आणि कोविड दोन्ही लवकर ओळखणे कठीण आहे. पण प्रयोगशाळेत ते सहज ओळखता येतात.
तापाने येणार्या रूग्णांची आता डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य आजारांसाठी चाचणी केली पाहिजे, जरी कोविड चाचणी निगेटिव्ह आली तरीही, संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचे मत आहे. डेंग्यूच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांमुळे अनेकदा चुकीचा पॉझिटिव्ह अहवाल मिळू शकतो. त्यामुळे डेंग्यू अँटीबॉडी चाचणीद्वारे डेंग्यूच्या संसर्गाची पुन्हा खात्री करणे फार महत्त्वाचे आहे. या माणसाच्या बाबतीत, एनआयव्हीने दोन्ही विषाणूंची स्थिती प्रमाणित केली आहे. त्याची पुन्हा खात्री करणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.