पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस असा केला आहे. उद्धव ठाकरे यांची ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार टीका होत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी फडतूस हा शब्द उच्चारण्यात आल्याने भक्त खवळले असल्याची जोरदार टीका केली आहे. तसेच भाजपने आतापर्यंत महापुरुषांचा अवमान कसा कसा केला याची यादीच मांडली आहे. फेसबुकवर एक पोस्ट करून सुषमा अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.
छत्रपती शिवरायांच्याबद्दल लाड, लोढा, कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. परिचारक यांनी तर शहीद पत्नींच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरली पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले इथले लाखो युवक बेरोजगार झाले पण भक्त चकार शब्दांनी बोलले नाहीत. संभाजीनगरच्या वज्रमुठ सभेमध्ये जे असंख्य मुस्लिम बौद्ध आणि अठरापगड जातीचे विविध धर्माचे संविधानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र आले. त्यांचा विटाळ म्हणून विकृत मानसिकतेच्या लोकांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडलं. त्या लाखो नागरिकांचा त्यांच्या जाती-धर्माचा एका अर्थाने अपमानच केला. पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत. पण फडतूस हा शब्द जसा ही उच्चारला गेला भक्त अक्षरशः कळवळले, असा हल्लाबोल अंधारे यांनी केला आहे.
ज्यांनी महाराष्ट्र आणि हा अवघा देश घडवला त्या महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाहीत. फक्त फडतूस या शब्दावर मात्र चेकाळतात याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.