पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेत अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये नागरिकांकडून जमा केलेला कर तिजोरीत जमा न करता परस्पर लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कर विभागाकडून दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कर वसूली करण्यासाठी दोन जणांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार कर वसूली ही करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये प्रत्यक्षात कर जमा होऊन रेकॉर्डसह पैसे तिजोरीत जमा न झाल्याचा प्रकार समोर आल्याने पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे. झोपडपट्टी सेवा शुल्क वसुलीसाठी नियुक्ती केलेल्या प्रकरणात हे गौडबंगाल समोर आल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
राज्यातील आर्थिक वर्षे सरत असतांना पालिकेकडून कर वसूलीवर भर दिला जातो. त्यासाठी राज्यातील बहुतांश पालिका या विशेष पथकाच्या माध्यमातून कर वसूल कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील असतात.
असाच प्रयत्न पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, ज्यांच्यावर ही कर वसूलीची जबाबदारी होती, त्याच आदित्य लोखंडे आणि स्वप्निल नेहतराव यांनी पालिकेलाच चुना लावला आहे.
पंढरपूर नगरपालिकेच्या कर विभागांमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. झोपडपट्टी शुल्क वसुली साठी मुख्याधिकाऱ्यांनी आदित्य लोखंडे आणि स्वप्निल नेहतराव या दोन शिपायांची विशेष लिपिक म्हणून 2019 मध्ये नेमणूक केली होती.
सलग चार वर्ष या दोघांनी सेवा शुल्क वसुल केले. मात्र त्यांचा भरणा केला नाही. आदित्य लोखंडे याने 2 लाख 56 हजार 139 रुपये तर स्वप्निल नेहतराव याने 11 लाख 95 रुपयापेक्षा जास्त रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
जवळपास 14 लाख 56 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी या दोघांनाही निलंबित केले असल्याची माहिती कर विभाग प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी माहिती दिली आहे. याबाबत कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
खरंतर नगर पालिकेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच कर्मचाऱ्यांनी पालिकेचा विश्वासघात केला आहे. यामध्ये प्राथमिक चौकशीत ही बाब उघडकीस आली असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे का? याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यावरून पालिकेत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
नागरिकांनी कर रूपी जमा केलेल्या पैशावर कुणा कुणाचा डोळा होता, याबाबत पालिकेत दबक्या आवाजात चर्चा सुरू असून या प्रकरणी पोलिसांत काही कार्यवाही होते का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.