खेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेडमध्ये दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानावर सभा होणार आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव गेल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे गोळीबार मैदानावरून धडाडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या तोफेच्या माऱ्यात कोण कोण शरपंजरी होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री रामदास कदम यांचं कोकणात वर्चस्व आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या नेत्यांचा कसा समाचार घेतात आणि या नेत्यांबाबत कोणते गौप्यस्फोट करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांची गोळीबार मैदानावर आज संध्याकाळी सभा होणार आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेही उपस्थित राहिल्या आहेत. या सभेला सुमारे 30 हजार लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सभेभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 26 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. त्यात 4 डीवायएसपी आणि 25 अतिरिक्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच 300 पोलीस, 50 होमगार्ड आणि बॉम्ब स्कॉड पथकाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे स्थानक, एसटी स्थानकावरही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. खेड आणि चिपळूणकडून येणाऱ्या वाहनांचा मार्गही बदलण्यात आला आहे.
दरम्यान, खेडमधील उद्धव ठाकरेंच्या सभेला मुस्लिम मराठी सेवा संघाने पाठिंबा दिला आहे. या सभेला 25 हजार मुस्लिम बांधव सहभागी होणार आहेत, असा दावा मुस्लिम सेवा संघाचे फारूक ठाकूर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील आमचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहणार आहेत. शिवसेनेने कधीही मुस्लिमांचा विरोध केला नाही. पाकिस्तान जिंकला म्हणून फटाके फोडणाऱ्यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे बोलायचे. आम्ही सगळे उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहणार आहोत, असं फारुक यांनी सांगितलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचं आवाहनही मुस्लिम संघटनांनी केलं होतं.
उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी ठाकरे गट आणि शिवसेनेत बॅनरवॉर सुरू झाला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या समर्थकांनी खेडमध्ये मोठ मोठे बॅनर्स लावून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. कितीही लांडगे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही. वाघ त्यांना फाडतोच हे लक्षात ठेवा, असं बॅनरवर रामदास कदम समर्थकांनी म्हटलं आहे. तसेच कोकणचे भाग्यविधाते, देवमाणूस असा रामदास कदमांचा उल्लेखही करण्यात आला आहे. तर दुसरीकडे संजय कदमांच्या पक्ष प्रवेशाचेही बॅनर्स खेडमध्ये लागले आहेत.
दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी संजय कदम यांनी मीडियाशी संवाद साधला. मी खेडमधील शिवसेनेचा पहिला सरपंच आहे. रामदास कदम मातोश्रीबाबत बेताल बडबड करत आहेत. रामदास कदमला अद्दल घडवण्यासाठीच शिवसेनेत प्रवेश करत आहे. रामदास कदमांकडे दलालां व्यक्तिरिक्त काहीच शिल्लक नाही. होळीच्या होमात आम्ही रामदास कदमांचं दहन करू, अशी टीका संजय कदम यांनी केली आहे.