सायखेडा/नाशिक : राज्यातील अनेक मंत्र्यांकडून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवला जातो. त्यामध्ये त्या त्या विभागाचे मंत्री, अधिकारी आणि नागरिक उपस्थित असतात. त्यामुळे नागरिकांच्या समस्या समोरा समोर सांगून त्यावर उपाय योजनाही सांगितल्या जातात. या जनता दरबारमध्ये अनेक वेळा अधिकारी आणि नागरिकांची खडाजंगीही झालेली पाहावयास मिळते. नागरिकांच्या समस्या त्या त्या मंत्र्यांसमोर सांगितल्या जात असल्याने आणि अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला जात असल्याने जैसे थी पडलेली कामांचा निपटाराही केला जातो. आजही नाशिक जिल्ह्यातील सायखेडामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांसह अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत.
भारती पवार यांच्या सुचनांमुळे नागरिकांची कामंही मार्गी लागणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये विविध समस्यांवर आज सायखेडा येथील उप बाजार समितीच्या आवारातील हॉलमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जनता दरबारचे आज आयोजन केले होते.
यावेळी वीट भट्ट्या बंद करण्याचे आदेश दिलेला असतानाही तीन वीट भट्ट्या चालू असल्याचा मुद्दा उपस्थित होताच वीट भट्टी मालकांमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर शाब्दिक चकामक उडाली.
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असला तरी ओझर येथे 54 बोरवेल असून यांना नवीन कनेक्शन मिळावे अशी मागणी केली होती.
त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ओझर ग्रामपंचायत आणि नव्याने झालेली नगरपंचायतकडे साडेअकरा कोटी रुपयांची थकबाकी असल्याने जीआरप्रमाणे नवीन कनेक्शन देता येणार नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मंत्री भारती पवार यांना सांगितले. त्यानंतर जीआर दाखवा मात्र अधिकारी जीआर दाखवू शकले नाहीत.
त्यामुळे तुम्ही मंत्र्यांना वेड्यात काढत असाल तर सर्वसामान्यांचे काय असे म्हणत सर्वच अधिकाऱ्यांची कान उघडणी करत माझ्याशी जीआरच्या नावाखाली खोटे बोलू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशारा अधिकाऱ्यांना दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणानल्याचे चित्र नागरिकांना पाहायला मिळाले.
नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामुळे येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी, शेत शिवार रस्ते, गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी, निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावात बिबट्यांची मोठी संख्या असल्याने येवल्यातील वन विभागाचे कार्यालय निफाड तालुक्यातील आणण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
पाणी योजनेला वीज प्रवाहाची समस्या असल्याने त्यां व्यथांसह अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र अधिकाऱ्यांना उत्तर न देता आल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
राज्यमंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जीआरच्या नावाखाली अधिकाऱ्यांना योग्य उत्तर आणि स्पष्टीकरण देता आली नाहीत.
त्यामुळे नागरिकांसमोरच अधिकाऱ्यांना सुनावत खोटं सांगण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्या अधिकाऱ्यांची काही खैर नाही अशा शब्दात जनता दरबार चालू असताना अधिकाऱ्यांचा समाचार घेतला आहे. त्यामुळे या जनता दरबारची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू होती.