मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. किशोरी पेडणेकरांची आज मुंबईच्या दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर SRA अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांची आज चौकशी झाली. विशेष म्हणजे पोलिसांनी पेडणेकरांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे.
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी SRA प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी काही लोकांना अटक देखील करण्यात आली होती. पण या प्रकरणात कुठेही किशोरी पेडणेकरांचं नाव जोडलं गेलं नव्हतं. मात्र आज पहिल्यांदाच किशोर पेडणेकर यांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांना उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी एसआरए प्रकल्पातील काही फ्लॅट आणि दुकानाचे गाळे परस्पर नावावर करुन मोठा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर आज किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली आहे.
किरीट सोमय्यांनी नेमके आरोप केले होते?
“किशोरी पेडणेकरांनी गरिबांचे गाळे ढापले होते ते त्यांना भाऊबीज निमित्ताने परत करावे. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मी एसआरएला पत्र पाठवलं आहे. वरळी गोमाता जनतामध्ये किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या परिवाराने अर्धा डझन गाळे झोपडपट्टीधारकांच्या नावाने ढापले आहेत. त्यांनी ते अजूनही परत केलेले नाहीत”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.