मुंबई | 4 जुलै 2023 : जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंह याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह चारजणांना गोळ्या घातल्या. या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चेतन सिंहला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. चेतन सिंह याने एके 47 मधून गोळ्या घातल्या. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता आरपीएफच्या जवानांना एके-47 ऐवजी पिस्तुल देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चेतन सिंह याची नार्को चाचणी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबारातील आरोपी चेतन सिंह हा पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीये. पोलीस जेव्हा जेव्हा चौकशी करायला येतात, तेव्हा तो तास न् तास गप्प राहतो. फक्त पोलिसांकडे एकटक बघत असतो. काहीही उत्तर देत नाही. चेतनकडून तपासात कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याची नार्को चाचणी करण्याच्या विचारात पोलीस आहेत. त्या दृष्टीने पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या असून कोर्टाकडून तशी परवानगी घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
चेतन सिंह याची नार्को चाचणी करण्याचा पोलीस विचार करत असले तरी नार्को चाचणी करणं तितकं सोप्पं नाहीये. आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. आरोपीची परवानगी घ्यावी लागेल. तसेच आरोपीच्या कुटुंबीयांची परवानगी मिळाल्यानंतरच आरोपीची नार्को टेस्ट करता येईल. जीआरपी पोलिस सतत चेतन सिंहच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु चेतन सिंहच्या कुटुंबाचा नंबर बंद आहे, त्यामुळे पोलिस त्याच्या कुटुंबाशी संपर्क करू शकत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, चेतनच्या पत्नीच्या दाव्यानुसार चेतन हा मानसिक रोगी आहे. चेतनची मानसिक प्रकृती ठिक नाहीये. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी त्याच्या आरोग्याशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांना देण्यात येणार आहे. त्यासाठी मी मुंबईत जाणार आहे, असं चेतनची पत्नी रेनू सिंह यांनी म्हटलं आहे. रेनू सध्या उत्तर प्रदेशात आहे.
त्याची प्रकृती अधिक खराब होती. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचारही सुरू होते. त्याचे चेकअपही झाले होते. मथुरा येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याचं मानसिक संतुलन ठिक नव्हतं, असं रेनूने सांगितलं. चेतनच्या कुटुंबीयांच्या मते काही दिवसांपूर्वी तो घरातच चक्कर येऊन पडला होता. त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन रक्त गोठलं होतं.