मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : रश्मी शुक्ला प्रकरणी फोन टॅपिंग प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीड (SID0 मधून रश्मी शुक्ला प्रकरणाची गोपनीय माहिती लिक झाली. पण ही माहिती कुणी लिक केली हे शोधता आलेलं नाही. सीबीआयने कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयडी ऑफिसमधील संगणक हॅक झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डेटा गेल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर कोर्टाने सीबीआयने सादर केलेला फोन टॅपिंग प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.
रश्मी शुक्ला प्रकरणातील ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या संस्थेने असं म्हणावं याचाच अर्थ आरोपींना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. आरोपीला पाठिशी घालण्यासाठी, वाचवण्यासाठी आता सीबीआयवर जनतेचा विश्वास राहिला नाही. जर सीबीआयचं स्टेटमेंट आलं असेल तर या देशातील ही महत्त्वाची संस्था कुचकामी झाली आहे, असं म्हणावं लागेल, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार हे नवीन नवीन विरोधी पक्षनेते आहेत. मी सर्वात अॅक्टिव्ह आणि सर्वात मोठा नेता आहे, हे त्यांना काँग्रेसला दाखवावं लागतं. विरोधी पक्षनेते झाल्यावर त्यांना काही गोष्टी बोलाव्या लागतात. पण जनतेला त्या गोष्टी पटत नसतात. त्यामुळे सीबीआय, लाचलूचतप विभागावर, ईडी आणि तपास यंत्रणेवर बोलावं लागतं. त्यांनी ईओडब्ल्यूवर अविश्वास दाखवला तर उद्या या देशात काहीच राहणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
रश्मी शुक्ला प्रकरणात विजय वडेट्टीवार यांना काही माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी. त्यांचेकडे काही नवीन कागदपत्रे असतील तर ती यंत्रणेला माहिती द्यावी. त्यावर सरकार चौकशी करेल, असं भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. त्यावर कोर्ट बघेल. आम्ही करण्याच्या अगोदर पोलिसांना ते कळतं आमचे फोन लगेच टॅप होतात, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
रश्मी शुल्का क्लिनचिट प्रकरणावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपावर निशाना साधत सीबीआयला लक्ष केलं आहे. विरोधकांची मुस्कटदाबी करायची आणि त्यांचे प्रमोशन करायचं असं भाजपाचं ठरलेले होतं. रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट मिळणार हे माहिती होतं. मात्र फोन टॅपिंग प्रकरण सिद्ध झालेलं असताना सीबीआयने कुठल्या आधारावर क्लिनचिट दिलीय याचं उत्तर सीबीआयला द्यावं लागणार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.