अजित पवार यांची चौकशी सुरूच राहील, शिंदे गटाच्या नेत्याने दिला सूचक इशारा

| Updated on: Jul 08, 2023 | 7:36 PM

अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे आमच्यात कुठलीही नाराजी नाही. काही प्रमाणात आमदारांची नाराजी होती ती आता दूर झाली आहे. भविष्यामध्ये आमची दिलजमाई होईल आणि आमचे नाते अधिक घट्ट होईल.

अजित पवार यांची चौकशी सुरूच राहील, शिंदे गटाच्या नेत्याने दिला सूचक इशारा
AJIT PAWAR AND EKNATH SHINDE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार मंत्रिमंडळाचाही विस्तार लवकरच होणार आहे. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांनी एक दिवस मंत्री व्हावे आणि लोकांचे प्रतिनिधित्व करावे. मी देखील पंधरा वर्षे सभागृहामध्ये कामकाज पाहिलेले आहे. जवळून बघितलेले आहे. त्यामुळे जर मला मंत्रिपदाची संधी मिळाली तर मी त्या संधीचे सोनेच करेन. पण, नाही मिळाली तरी देखील काही हरकत नाही. मंत्रिमंडळात माझा समावेश आहे असे जर मंत्री दीपक केसरकर म्हणत असतील तर त्यावर मी काय बोलणार? त्यांना कोणी माहिती दिली हे मला माहित नाही. पण, जर ते म्हणत असतील तर ही चांगली बाब आहे, असे शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्ट केले.

शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे वाटत होते. मात्र, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही त्यामुळे ते नाराज झाले होते. तर, दुसऱ्या मंत्रिमंडळात विस्तारातही त्यांना मंत्रिपद मिळेल असे वाटत असताना पुन्हा डावलण्यात आल्याने त्यांच्या नाराजीत आणखीनच भर पडली.

हे सुद्धा वाचा

शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सामील झाले. त्या शपथविधी कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्याच आमदारांना शपथ देण्यात आली. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळात तरी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा संजय शिरसाट ठेऊन आहेत. यावर भाष्य करताना मंत्रिमंडळ विस्तार आता ताटकळत ठेवला जाणार नाही. तो होणार आहे आणि एक ते दोन दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे ते म्हणाले.

अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे आमच्यात कुठलीही नाराजी नाही. काही प्रमाणात आमदारांची नाराजी होती ती आता दूर झाली आहे. भविष्यामध्ये आमची दिलजमाई होईल आणि आमचे नाते अधिक घट्ट होईल. महाराष्ट्राचा विकासाचा जो गाडा आहे तो आणखी मजबुतीने हाकला जाईल, असे संजय शिरसाट म्हणाले.

अजित दादा यांच्यावर कुठलाही एफआयआर नाही. मात्र, त्यांची चौकशी संपली अशातला काही भाग नाही. त्यांच्या ज्या चौकश्या सुरु आहे. त्या सुरूच राहतील. मात्र त्यातून काय निष्पन्न होईल ते पहावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नेते बदनाम झाले असते

अंमळनेरमध्ये कुणा नेत्याच्या स्वागतासाठी आश्रम शाळेच्या मुलांना रस्त्याच्या कडेला जाणून बुजून उभं केलं जात असेल तर ते बरोबर नाही. कारण, जर उद्या त्यांना काही त्रास झाला असता तर त्याची जबाबदारी नेत्यांवरच आली असती. त्या ठिकाणी ते नेते बदनाम झाले असते. त्यामुळे भविष्यात असा प्रकार होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असे संजय शिरसाट म्हणाले.