मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखात गुजरातमधील महिलांच्या सुरक्षेवर भाष्य करण्यात आलं आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. “गुजरातचा विकास झपाट्याने होतो आहे. रोजगार वाढला आहे. हे इतके सर्व मोदी-शहांच्या राजवटीने घडवून आणले, मग ज्या हजारो मुली गुजरातमधून बेपत्ता झाल्या, होत आहेत, त्या बेपत्ता मुलींचा शोध कोण घेणार?”, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
कायद्याचे राज्य गुजरातमध्ये अस्तित्वात असेल तर त्या मुलींना न्याय मिळेल. नाही तर या मुलींचे पलायन किंवा अपहरणास नेहरू-गांधी परिवारच कसा जबाबदार आहे यावर ‘मन की बाता-बाती’ करून लोकांना गुमराह केले जाईल. गुजरात राज्यातून हजारो मुली बेपत्ता होणे हे बरे लक्षण नाही! मुली कोठे गेल्या? याची चिंता पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना नसेल तर त्यांना कोणत्याच प्रश्नाची चिंता नाही, असाच याचा अर्थ!, असं म्हणत मोदी-शाह यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री शहा ही जोडगोळी आपणच विश्वाचे तारणहार असल्याच्या आविर्भावात वावरत असते. 2014 च्या आधी भारत देश अस्तित्वात नव्हता, येथे कायदा नव्हता. संस्कृती नव्हती. 2014 ला मोदी आले आणि देशात सगळे आबादी आबाद झाले, असे ते आणि त्यांची भक्तमंडळी सुचवीत असते. मात्र आता मोदी-शहांच्या कारभाराचे ढोंग उघडे पाडणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
देशातील महिला असुरक्षित आहेत. महिला अत्याचाराच्या रोज थरारक कहाण्या प्रसिद्ध होत आहेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला कुस्तीपटू न्यायासाठी बसल्या आहेत, पण त्यांच्यावर ना पंतप्रधान मोदी बोलत ना गृहमंत्री शहा बोलायला तयार, असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.