वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 1 लाख 22 हजार डॉलर म्हणजे 1,00,14,010.10 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्सशी संबंधित प्रकरणात मंगळवारी मध्यरात्री मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांना हा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात ट्रम्प यांनी कोर्टाला समोर स्वत:ला सरेंडर केलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सध्या त्यांची सुटका करण्यात आली आहे. 2016च्या निवडणुकीत पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स हिला पैसे देण्याचा आणि दस्ताऐवजांमध्ये हेराफेरीसहीत एकूण 34 आरोप ट्रम्प यांच्यावर लावण्यात आले होते. मात्र, कोर्टाने ट्रम्प यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील या प्रकरणाचे ट्रायल जानेवारी 2024मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, कोर्टाने या प्रकरणावर 4 डिसेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्या दिवशी ट्रम्प यांना कोर्टात हजर राहावे लागणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजता ही सुनावणी सुरू झाली होती. यावेळी ट्रम्प यांनी आपण निर्दोष असल्याचं म्हटलं होतं. हेराफेरीच्या 34 प्रकरणात त्यांनी स्वत:ला नो गिल्टी असं म्हटलं होतं. या प्रकरणात ट्रम्प यांची सुटका करण्यात आली असली तरी ट्रम्प यांना सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट न टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा ट्रम्प कोर्टातून बाहेर पडले आणि आपल्या लवाजम्यासह घरी गेले.
या आधी ट्रम्प कोर्ट परिसरात येताच पोलिसांनी त्यांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्ट रुममध्ये हजर करण्यात आलं होतं. ट्रम्पने आपलं गुपित लपवण्यासाठी 130.000 डॉलरची भरपाई केली होती. पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची माहिती समोर आल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी हे पैसे मोजले होते, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने या प्रकरणाची ट्रायल 2024मध्ये सुरू होऊ शकते, असं कोर्टाने म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर 16 पानांचं आरोपत्र दाखल करण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी नियमांचं उल्लंघन केलं. 2016च्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नकारात्मक बातम्या छापून येऊ नये, खासकरून पॉर्न स्टारशी असलेल्या संबंधाच्या बातम्या छापल्या जाऊ नये म्हणून ट्रम्प यांनी ही रक्कम मोजल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.