मुंबई: पहिल्या सिझनप्रमाणेच ‘शार्क टँक इंडिया’चा दुसरा सिझनसुद्धा टेलिव्हिजनवर लोकप्रिय ठरतोय. आपल्या स्टार्टअप्ससाठी गुंतवणूक मिळवण्यासाठी बरेच उद्योजक या शोमध्ये हजेरी लावतात. यापैकी ज्यांच्या कल्पना अत्यंत अनोख्या असतात, त्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतात. या शोमध्ये आलेले बरेच उद्योजक रातोरात स्टार बनले. काहींना गुंतवणूक मिळाली नसली तरी शोमुळे प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे व्यवसायात मोठा हातभार लागला. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये 85 वर्षीय आजोबांनी हजेरी लावली. या आजोबांच्या व्यवसायाची कल्पना ऐकून शार्क्स म्हणजेच शोचे परीक्षकसुद्धा थक्क झाले.
मिस्टर आरके चौधरी हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत एका अशा आयुर्वेदिक तेलाची डील घेऊन शार्क्ससमोर आले होते, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वयाच्या 85 व्या वर्षीसुद्धा टक्कल असलेल्या डोक्यावर केस उगवतील, असा दावा त्यांनी जजेससमोर केला. आरके चौधरी यांच्या हेअरकेअर आणि स्किनकेअर कंपनीचं नाव Avimee Herbal असं आहे.
कोविडनंतर घरात सर्वांनाच केस गळण्याची समस्या जाणून लागल्याचं आरके यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी ही कंपनी सुरू केली. कोविडमध्ये जेव्हा मुलांना केस गळण्याची समस्या जाणवू लागली, तेव्हा त्यांनी हे तेल बनवलं. हे तेल आधी त्यांनी त्यांच्या मुलीला वापरायला दिलं. त्यावर मुलीने आधी त्यांनाच ते तेल वापरून पाहण्याचा सल्ला दिला. 85 वर्षीय आरके चौधरी पुढे म्हणाले, “माझं डोकं म्हणजे जणू क्रिकेटचं साफ केलेलं मैदानाच झालं होतं. पण हे तेल वापरल्यापासून डोक्यावर पुन्हा केस येऊ लागले.”
आरके चौधरी यांची ही कहाणी ऐकून शार्क्ससुद्धा थक्क झाले. या व्यवसायासाठी त्यांनी 2.8 कोटी रुपयांसाठी 0.5 टक्के इक्विटीची मागणी केली. मात्र शार्क्सना ही रक्कम खूप मोठी वाटली. अमन गुप्ता, नमिता थापर आणि पियुश बंसल यांनी डील करण्यास नकार दिला. तर अमित जैनने 1 कोटी रुपयांवर 2.5 टक्के इक्विटीची ऑफर दिली. अनुपम मित्तलनेही 70 लाख रुपयांवर 2 टक्के इक्विटीची ऑफर दिली. मात्र आरके चौधरी हे 2.8 कोटी रुपयांवर 1.5 टक्के इक्विटीपेक्षा खाली व्यवहार करू इच्छित नव्हते. त्यामुळे ‘शार्क टँक इंडिया 2’मध्ये आरके चौधरी यांना मनासारखी डील मिळू शकली नाही.