मुंबई : कर्नाटकातील भाजपच्या पराभवावरून दैनिक ‘सामना’तून भाजपला डिवचण्यात आलं आहे. ऑपरेशन लोटस घडवून, धमक्या देऊन, धर्मांध प्रचार करून, विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावून निडणुका जिंकण्याचे दिवस गेले आहेत. भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव करून शकते, हा कर्नाटकाच्या निकालाने धडा दिला आहे. कर्नाटकाची जनता शहाणी आहे. हाच शहाणपणाचा संदेश आता देशभरात गेल्याशिवाय राहणार नही. कर्नाटकात खऱ्या अर्थाने ऑपरेशन लोटस झालं आहे. राष्ट्रीय पातळीवरही आता तेच होईल, असं दावा दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात कर्नाटकातील निकालाचे विश्लेषण करण्यात आलं आहे. तसेच मोदी-शाहांना कानडी जनतेने झिडकारल्याचंही म्हटलं आहे. मोदी आणि शाहा यांचा कानडी जनतेने पराभव केला हा देशासाठी मोठा शुभ शकून आहे. काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षाला अवघ्या 65 जागांवर आणून सोडले. काँग्रेसने भाजपकडील दक्षिणेतील एकमेव राज्य हिसकावून घेतलं आहे. त्यामुळे देशात 2024मध्ये काय घडेल याचे दिशादर्शन कानडी जनतेने केलेले आहे, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
कर्नाटकातील मोदी आणि शाह यांची भाषणे म्हणजे राजकीय थिल्लरपणाच होता. त्यांनी हिजाबचा विषय चालवला. काँग्रेसने बजरंग दलावर बंदीची भाषा करताच हा बजरंग बलीचा अपमान असल्याचं भाजपने म्हटलं. या सर्वांचा काही एक परिणाम कर्नाटकात झाला नाही. बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी आणि शाह यांच्या टाळक्यात हाणली. हीच विजयी गदा त्यांनी राहुल गांधी यांच्या खांद्यावर स्पष्ट ठेवली आहे. कर्नाटकात नकली हिंदुत्वही चालले नाही, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
कर्नाटकातील जनतेने मोदींच्या रडण्याला, हिंदुत्वाला आणि धार्मिक मुद्द्यांना अजिबात जुमानले नाही. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला तर दंगली होतील, या अमित शाह यांच्या धमकीलाही कानडी जनतेने जुमानले नाही. भाजपने चालवलेले ऑपरेशन लोटसही कानडी जनतेने चिरडून टाकले आहे, असं सांगतानाच कर्नाटकात काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं आहे. त्यामुळे फोडाफोडी करून सत्ता काबीज करण्याचे स्वप्नही भाजप पाहू शकत नाही. महाराष्ट्राप्रमाणे एखादा पहाटेचा शपथविधी घडवून आणण्याची कुवतही कर्नाटकातील भाजपमध्ये नाही, असंही अग्रलेखातून डिवचण्यात आलं आहे.