मुंबई : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटकातील लोकांनी फोडाफोडीचं राजकारणाला धडा शिकवला आहे. तसेच धार्मिक आणि जातीय राजकारणाला थारा दिलेला नाही. काँग्रेसच्या हाती जनतेने सत्ता दिली आहे. येत्या 2024च्या लोकसभा निवडणुकीतही हाच कल दिसून येण्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने केवळ कर्नाटकात एन्ट्री करण्यासाठी निवडणूक लढवली होती, असंही स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी कर्नाटकात शक्तीशाली पक्ष नाही. आम्ही सात उमेदवार उभे केले. त्यातील एकाच उमेदवाराला आम्ही शक्ती दिली होती. तिथे रिझल्ट येईल असं वाटत होतं. निपाणीत आमचा उमेदवार दुसरा क्रमांकावर आहे. तिथे यश मिळेल असं वाटत नाही. कारण सहा हजाराचं अंतर आहे. पण एखाद्या राज्यात एन्ट्री करायची असेल तर त्यासाठी निवडणूक लढवायची होती. ते आम्ही केलं, असं शरद पवार यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कर्नाटकात भाजपचा पराभव होईल, हे आम्ही आधीच सांगितलं होतं. त्यांचं सरकार जरी असलं तरी देशातील वरिष्ठ नेते प्रचारासाठी आले होते. तिथल्या जनतेचा रोख या लोकांच्या विरोधात जाईल असं आम्हाला वाटत होतं. तेच झालं. अलिकडच्या काळात भाजपकडून जिथे त्यांचं राज्य नाही, इतरांचे राज्य आहेत तिथे आमदार फोडून राज्य ताब्यात घेतलं जात आहे. कर्नाटकात त्यांनी तेच केलं. आधीच्या सरकारचे आमदार फोडून त्यांनी सरकार घालवलं.
महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदे यांनी केलं. तेच कर्नाटकात झालं. गोव्यातही भाजपने बहुमत नसताना राज्य हातात घेतलं. ही नवी पद्धत भाजपने सुरू केली. साधनं आणि संपत्तीचा वापर केला. ही चिंताजनक बाब आहे. पण फोडाफोडी आणि खोक्याचं राजकारण लोकांना मान्य नाही. हे कर्नाटकाच्या निवडणुकीतून दिसून येतं, असं पवार म्हणाले.
कर्नाटकात आतापर्यंत 65 ठिकाणी भाजपच्या बाजूने कल आहे. काँग्रेसच्या बाजूने 133 ठिकाणी आहे. म्हणजे काँग्रेसला दुप्पट जागा मिळताना दिसत आहेत. याचा अर्थ भाजपचा सपशेल पराभव करण्याचा निर्णय तिथल्या लोकांनी घेतला होता. कारण सत्तेचा आणि साधनांचा गैरवापर याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. देशात चुकीचं शासन करणाऱ्यांना धडा शिकवला. ही प्रक्रिया संपूर्ण देशात होईल, असं त्यांनी सांगितलं.
केरळमध्ये भाजपचं सरकार नाही, कर्नाटकात नाही. तेलंगनात नाही. आंध्रात नाही. राजस्थानात नाही. दिल्लीत नाही, झारखंडमध्ये नाही. पंजाबमध्ये नाही. पश्चिम बंगालमध्येही नाही आणि बिहारमध्ये नाही. बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेच्या बाहेर जाणारा आहे. 2024मध्ये ज्या निवडणुका होतील. त्यात काय अंदाज असेल हे या निकालातून स्पष्ट होत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.