मुंबई : कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता एक पत्थर तो तबियत से उछालो यारों..असा एक शेर प्रसिद्ध आहे. जर माणसाकडे जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर किती संकटे आली तरी माणूस त्यावर मात करून आपल्याला हवे तसे आपले आयुष्याचं सोनं करु शकतो. इच्छा असेल तर मार्ग आपोआप निघून माणसाच्या पंखात बळ येते…आता सीबीएसईचे निकाल नुकतेच लागले आहेत. यात देशभरातील लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई परीक्षेत चंदीगडच्या एका अॅसिड हल्ला पिडीत मुलीने दहावीच्या परीक्षेत 95.2 टक्के मिळवित नवा इतिहास रचला आहे. तिची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
12 मे रोजी सीबीएसई परीक्षेचे दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत. यंदा 10 च्या परीक्षेत उत्तीर्णतेचे पर्सेटाइल 95.2 टक्के होते. सीबीएसई दहावीच्या परीक्षेत चंदीगडच्या 15 वर्षीय काफी हीला 95.2 टक्के मिळाले आहेत. काफी अवघी तीन वर्षांची असताना तिच्यावर त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी अॅसिड टाकले. त्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा तर भाजलाच शिवाय तिची दृष्टी देखील गेली. त्यामुळे तिने ब्रेल लिपीतून दहावीचा अभ्यास केला. आणि ती तिच्या शाळेतील टॉपर बनली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना काफी हीने सांगितले की, मी दर दिवशी पाच ते सहा तास अभ्यास करायची. माझे आई-वडील आणि शिक्षकांनी मला खूपच सहकार्य केले. आपल्या मोठेपणी आयएएस अधिकारी बनून देश आणि समाजाची सेवा करायची आहे असे तिने म्हटले आहे.
काफी हीचे वडील हरीयाणा सचिवालयात शिपायाची नोकरी करतात. आता ते आपल्या कुटुंबियासह शास्रीनगरात राहतात. काफी हीचे वडील पवन म्हणतात की काफी जेव्हा तीन वर्षांची होती तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अॅसिडचा हल्ला केला. त्यात काफी हीला प्रचंड जखमा झाल्या. तिची डोळ्यांची दृष्टी गेल्याने तिचे वडीलांनी अनेक ठीकाणच्या डॉक्टरांना तिला दाखविले परंतू काही उपयोग झाला नाही. त्यांनी त्यांच्या लेकीला खूप शिकवायचे असे ठरविले. तिला आयएएसची तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले. आपण तिला संपूर्णपणे सहकार्य करणार असून तिच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.