पुणे | 25 ऑगस्ट 2023 : पुणे शहर 2010 मध्ये एका खुनामुळे हादरले होते. या घटनेत युवकावर 37 वार कोयत्याने करण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनवाणी झाली. अखेर या खटल्याचा निकाल आला आहे. पुणे न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते.
पुणे येथे राकेश नामदेव घुले (वय २५, रा. बोपखेल) यांचा 21 नोव्हेंबर 2010 मध्ये खून करण्यात आला होता. पूर्व वैमनस्यातून हा खून झाला होता. यापूर्वी मार्च 2010 मध्ये राकेश घुले यांनी यातील आरोपींवर हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी राकेश घुले यांचा हल्ला करण्यात आला. हैदर जावेद सय्यद (वय १८), विक्रम ऊर्फ विक्की नंदू बिहारी (वय २१), साजीश अशोक कुरवत (तिघेही रा. काळेवाडी) आणि अविनाश गौतम बनसोडे (वय १८, बोपखेल) या आरोपींना कोयत्याने राकेश घुले याच्यावर वार केले होते. काळेवाडीतील हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. तब्बल 37 वार झाल्यामुळे राकेश घुले याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी हैदर जावेद सय्यद, विक्रम ऊर्फ विक्की नंदू बिहारी, साजीश अशोक कुरवत आणि अविनाश गौतम बनसोडे यांना अटक केली. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालला. साक्षी, पुराव्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्या. जाधव यांनी निकाल दिला. या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. तसेच प्रत्येक आरोपींना दोन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हैदर जावेद सय्यद, विक्रम ऊर्फ विक्की नंदू बिहारी, साजीश अशोक कुरवत आणि अविनाश गौतम बनसोडे हे चौघेही सप्टेंबर 2012 पासून 16 फेब्रुवारी 2019 पर्यंत कारागृहात होते. आरोपींना केलेल्या दंडाच्या रकमेतून पाच लाख रुपये राकेश घुले यांच्या कुटुंबियांना भरपाई म्हणून द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.