पुणे | 25 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची हत्या झाली होती. या प्रकरणास दहा वर्षे झाली आहे. त्यानंतर अजून आरोपींना शिक्षा नाही. या प्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. या सुनावणी दरम्यान सीबीआयच्या तपासी अधिकाऱ्याची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील महत्त्वाची अपडेट पुणे न्यायालयातून मिळाली आहे. दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील सातवा प्रत्यक्षदर्शी होता, पण मी तो का तपासला नाही किंवा तसे रेकॉर्डही नाही, तत्कालीन सीबीआय अधिकारी ए. आर. सिंग यांनी न्यायालयात ही कबुली दिली. तसेच दोन साक्षीदारांना सोडून इतर साक्षीदारांना संशयित आरोपींची छायाचित्रे दाखवण्यात आली नाहीत, अशी कबुली सिंग यांनी उलटतपासणीत दिली.
नरेंद्र दाभोलकर यांच्यावर ज्या गोळ्या झाडल्या होत्या त्या पुणे येथील खडकीचा दारुगोळा कारखान्यातील होत्या. मात्र, या गोळ्या कारखान्यातून बाहेर कशा आल्या? यासंदर्भात तपास केला गेली नाही, असे सीबीआय तत्कालीन तपास अधिकारी एस. आर सिंग यांनी सांगितले. संशयित आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर येरवडा कारागृहात असल्याची माहिती मला होती. तसेच या खून प्रकरणातील सर्व साक्षीदारही पुणे शहरात राहणारे आहेत, हे ही मला माहीत आहे. परंतु मी त्यांची कारागृहातील ओळख परेड देखील केली नाही, असे सिंग यांनी म्हटले आहे.
नरेंद्र महाराज आणि त्यांच्या अनुयायांमध्ये वैर होते का? असा प्रश्न बचाव पक्षाकडून सिंग यांना विचारला. त्यांनी त्याला ‘हो’ असे उत्तर दिले. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला, त्या वेळी घटनास्थळावर नरेंद्र महाराज यांचे अनुयायी होते का? त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.