सुनिल जाधव, प्रतिनिधी, डोंबिवली : आय.सी.आय.सी.आय बँकेच्या (ICICI Bank Robbery Dombivli) शाखेतून तब्बल 12 कोटी 20 लाख रूपयांची रोकड लंपास करण्यात आली.चोरीचे कोट्यवधी रुपये चोराने आठवडाभर मुंब्रा (Mumbra Crime News) परिसरात टेम्पोत लपवून ठेवले. या चोरीप्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे पोलिसांनी चौघांपैकी तिघांना मुंब्रा परिसरातून बेड्या ठोकल्यात. टेम्पो मधून 5 कोटी 80 लाखांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरात (Manpada, Dombivli) ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा परिसरातील आय.सी.आय.सी.आय बँकेच्या शाखेतून तब्बल 12.20 कोटी रूपयांची रोकड चोरणा-या चौघांपैकी तिघांना ठाणे मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 5.80 कोटीची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे.
9 ते 11 जुलै दरम्यान हा धाडसी चोरीचा बँकेत प्रकार घडला. बँकेत कार्यरत असणा-या व्यक्तीने अन्य तिघांच्या साथीने 12 कोटी 20 लाखांची रोकड चोरली होती. याप्रकरणी स्थानिक मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मानपाडा पोलिसांसह ठाणे मालमत्ता गुन्हे शाखा पोलिसांच्या वतीने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. मानपाडा पोलिस आणि मालमत्ता गुन्हे शाखेच्या वतीने गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकं नेमण्यात आली होती.
यात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच पोलिस कर्मचा-यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळच्या सुमारास मुंब्रा येथील मित्तल मैदानाजवळ सापळा लावून पोलिसांनी एकाला अटक केली. इसरार कुरेशी असे त्याचे नाव असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार शमशाद खान आणि अनुज गिरी यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांचीही कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिघांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या रोकडपैकी 5 कोटी 80 लाखांची रोकड तर 10 लाख 2 हजार 500 रूपये किमतीचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अल्ताफ शेख असलेला बँक कर्मचारी मात्र अद्याप फरार आहे.
9 व 10 तारखेला बँकेला सुट्टी होती. ११ जुलैला, या बँकेमधील सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्यानंतर संबंधित बँक प्रशासनाने टेक्निकल टीमला संपर्क साधून त्यांना दुरुस्तीसाठी बोलावले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 तारखेला त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले त्यावेळी यातील काही फुटेज डिलीट असल्याचे आढळून आले.
नंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे ठेवण्याची जागा तपासली असता, त्यामधील 34 कोटी रुपये गायब होते. हा सर्व प्रकार पाहून बँकेच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय तपासले असता, सुरक्षा रक्षकाला पैशांनी भरलेल्या काही बॅग आढळून आल्या. या बॅगेमध्ये 34 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपये आढळून आले. तसेच या पैशांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेला कर्मचारी अल्ताफ शेख हा देखील गायब होता. यातील मुख्य आरोपी अल्ताफ असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. उर्वरित रक्कम त्याच्याकडे असू शकते असा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणात 34 कोटी रुपयांची चोरी झाली होती. परंतु त्यातील 12 कोटी 20 लाख रुपये आरोपी घेऊन गेला होता. तर, उर्वरित रक्कम बँकेच्या आवरात आढळून आली होती. अल्ताफने बँकेतील 12 कोटी 20 लाख रुपयांची रक्कम चोरल्या नंतर त्याच्या ओळखीच्या इसरार, शमसाद आणि गिरी या तिघांना बोलावून घेतले. त्यांच्या टेम्पोमध्ये 5 कोटी 80 लाख रुपये ठेवले. हा टेम्पो मुंब्रा येथे एका ठिकाणी ठेवला होता. सुमारे एक आठवडाभर या टेम्पोमध्ये कोट्यवधी रुपये पडून होते. तर उरलेली रक्कम घेऊन अल्ताफ फरार झाला. सध्या पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकत सखोल चौकशी सुरू केली असून फरार असलेल्या अल्ताफचा शोध सुरू केला आहे