इंदूर : महाराष्ट्रात रहाणाऱ्या शिवाचा विवाह इंदूरमधील काजलसोबत 4 सप्टेंबर 2013 रोजी झाला. काजलचे वडील पूर्वी महाराष्ट्रात नोकरीला होते. त्यांनी व्हीआरएस घेऊन आपले बस्तान इंदोरला हलवले होते. मोठ्या थाटात शिवा आणि काजल याचा विवाह झाला. लग्नानंतर लग्नानंतर काही दिवस सर्व सुरळीत चालले होते. काजलला स्वहिमतीवर काही तरी करून दाखविण्याची प्रबळ इच्छा होती. तिने शिवाला एअर होस्टेसचा कोर्स करण्याची परवानगी मागितली. पतीनेही त्याला होकार दिला. तिच्या अभ्यासासाठी त्याने दहा लाख इतका खर्चही केला. काजलचा कोर्स पूर्ण झाला. आता ती नोकरी शोधू लागली. पण, सासर सोडून तिला इतर कुठे जाण्याची परवानगी शिवाने नाकारली.
दरम्यान काजल गरोदरपणासाठी माहेरी इंदूरला आली. नोकरीसाठी नवऱ्याने परवानगी दिली नाही हा राग तिच्या मनात होताच. त्यामुळे माहेरी येताच तिने आपला फोन बंद केला. तिला मुलगी झाली. काही दिवसांनी काजलने आपल्या वकिलांमार्फत पती, सासरा आणि सासू यांच्याविरोधात इंदूर जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली.
इंदूर जिल्हा न्यायालयाने यावर सुनावणी करताना संबंधित पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. 13 फेब्रुवारी 2023 रोजी न्यायालयाने आरोपी पक्षाला समन्स बजावून 10 एप्रिल 2023 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. कोर्टाचे समन्स आल्याने शिवाला या प्रकरणाची माहिती कळली.
शिवा इंदूरला आला. आपल्या वकील प्रीति मेहरा यांच्यामार्फत त्याने कोर्टाला पत्नी काजल हिने खोटे प्रतिज्ञापत्र देऊन न्यायालयाची फसवणूक केली असे सांगितले. त्याने जी काही माहिती दिली त्यामुळे न्यायालयही संभ्रमात पडले.
काजल हिने आपले पती, सासू आणि सासरे 15 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ करत असल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यानुसार कोर्टाने 13 फेब्रुवारी 2023 रोजी तिघांविरोधात समन्स बजावले. पण, शिवा याने वकील प्रीति मेहरा यांच्यामार्फत न्यायालयाला अशी माहिती दिली की त्याचे आणि काजलचे लग्न होण्यापूर्वीच वडिलांचे निधन झाले आहे.
14 फेब्रुवारी 2002 रोजी आपल्या वडिलांचे निधन झाले असून त्याला आता 21 वर्ष झाले अशी माहिती शिवा याने कोर्टाला दिली. शिवाय त्याने वडिलांच्या मृत्यूसंबंधित कागदपत्रेही न्यायालयासमोर पुरावा म्हणून सादर केली. पत्नीने न्यायालयाला खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आपल्यावर आणि आपल्या मृत वडिलांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे असे त्याने सांगितले.
यानंतर शिवा आणि त्याच्या आईने काजलविरुद्ध खोटा अर्ज सादर करून न्यायालयाला चुकीची माहिती देऊन वेळ वाया घालवल्याप्रकरणी याचिका दाखल केली. या संपूर्ण प्रकरणावर येत्या काही दिवसांत सुनावणी होणार आहे. मात्र, या प्रकरणाची सुनावणी न्यायालय कशी पद्धतीने घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.