नवी दिल्ली / 23 ऑगस्ट 2023 : अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर केला आहे. अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांना मदत केल्याचा आरोपी शर्मा यांच्यावर होता. शर्मा यांनी जानेवारीत मुंबई उच्च न्यालायलात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
प्रदीप शर्मा यांना जून 2021 मध्ये मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटेलियाजवळ स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणातही शर्मा यांची भूमिका एनआयएच्या चौकशीत आहे. अँटेलियाजवळ जिलेटिनने भरलेली एक SUV सापडली होती. ही एसयुव्ही ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची होती. हिरेन यांचाही नंतर मृत्यू झाला. ठाण्याजवळ खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला होता.
जेष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी प्रदीप शर्मा यांची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. यावेळी रोहतगी यांनी शर्मा यांच्या पोलीस दलातील कामगिरीवर प्रकाशझोत टाकला. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून शर्मा मुंबई पोलिसांच्या एन्काउंटर पथकाचा भाग होते. त्यांनी विविध चकमकींमध्ये 300 हून अधिक गुन्हेगारांना ठार मारले. शर्मा यांचा थेट सचिन वाझेशी संबंध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अस्तित्वात नसल्याचे रोहतगी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच, रोहतगी यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातच खुनाचा कट रचण्याच्या आरोपावर समर्पक प्रश्न उपस्थित केले. प्रदीप शर्मा यांची केवळ दोन वेळा सचिन वाझे यांच्याशी भेट झाली होती. पहिली भेट मलबार पोलीस ठाण्यात आणि दुसरी भेट पोलीस आयुक्त कार्यालयात झाली होती, हे रोहतगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच असा हाय-प्रोफाइल गुन्हा खरोखरच आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत रचला जाऊ शकतो का? असा सवालही रोहतगी यांनी केला.