मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज टाटा (Tata) उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. टाटा यांची सदिच्छा भेट घेतल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी रटन टाटा यांची त्यांच्या कुलाब्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि रतन टाटा यांच्यामध्ये 45 मिनिटे चर्चा झाली. यावेळी रतन टाट यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. मी रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना देण्यात येणाऱ्या स्थगितीबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नवे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयाला स्थिगीती दिली. मात्र अशा पद्धतीने स्थगिती दिल्यास न्यायलयीन पेच निर्माण होऊ शकतात असे म्हणत अनेक सचिवांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, कोणत्याही विकास कामांना स्थगिती देण्यात येत नाहीये, फक्त जे निर्णय घाई गडबडीने घेण्यात आले आहेत, त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांची काहीही तक्रार नाही, त्यांच्यासोबत बैठक झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा माजी मुख्यमंत्री असा केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असाच केला आहे.