लासलगाव : घटत्या दरामुळे वावरातला (Onion Crop) कांदा बांधावर टाकणे शेतकऱ्यांच्या जीवावर आले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून (Onion Rate) कांद्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. त्याचा परिणाम आगामीव क्षेत्रावर देखील होईल. अशाप्रकारे कांद्याचा वांदा होत असताना मात्र, पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सजवलेली बैलगाडी अन् पुढे ढोल-ताशाचा गजरात कांद्याच्या दोन गाड्या बाजारात दाखल झाल्या आहेत. संबळाच्या तालावर दाखल झालेला कांदा असातसा नसून विषमुक्त आहे त्यामुळे त्याचे जंगी स्वागत शेतकऱ्यांकडून करण्यात आले. (Organic Farm) सेंद्रिय पध्दतीने कांद्याचे उत्पादन हा प्रयोग यशस्वी कऱण्यासाठी निफाड तालुक्यातील मौजे सुकेणेच्या श्याम मोगल व ओझर येथील शेतकऱ्यांनी मोठे परीश्रम घेतले. अखेर उत्पादन पदरी पडताच त्यांनी अशाप्रकारे मिरवणूक काढून कांदा बाजारात आणला होता.
कांद्याचे उत्पादन घेताना केवळ बाजारभावाचा विचार केला जातो. कांदा नगदी पीक असून त्यामधून किती रुपये मिळतात हेच पाहिले जाते. त्यामुळे गुणवत्तेपेक्षा त्याचे उत्पादन किती यावरच शेतकऱ्यांचेही लक्ष असते. पण सुकेणेच्या श्याम मोगल व ओझर येथील दिगंबर कदम या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खते वापरून विषमुक्त पद्धतीने कांद्याचे उत्पादन उत्पादन घेतले आहे. कांद्याचा रोजच्या आहारात वापर होतो. त्यामुळे किमान त्याचे उत्पादन तरी विषमुक्त व्हावे या अनुशंगाने या दोन शेतकऱ्यांनी प्रयोग केला होता. अखेर त्याला यश आले असून पीक पध्दतीच्या बदलाबरोबर उत्पादन वाढीवरही भर दिला जाणार आहे.
सेंद्रिय शेती पध्दतीने कांद्याचे उत्पादन शक्य नाही. बदलते वातावरण, निसर्गाचा लहरीपणा आणि ढगाळ वातावरण यामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला की रासायनिक फवारणी ही गरजेचीच होते. पण अशा परस्थितीवरही मात करुन या श्याम मोगल व दिगंबर कदम यांनी हा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे. त्यामुळे बाजारातदेखील आता विषमुक्त कांदा दाखल होतोय हे माहिती करुन देण्याच्या उद्देशाने अशाप्रकारे मिरवणूक काढत कांदा बाजारात आणला गेला.
विषमुक्त शेतीमालाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. मात्र, याची मार्केंटींग होणे गरजेचे आहे. सध्या नियमित कांद्याला 500 ते 1000 रुपये सरासरी क्विंटलचा दर आहे. असे असताना या कांद्याला 1750 रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे. विषमुक्त मालाला मागणी कायम आहे मात्र, ग्राहकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. यंदा प्रयोग यशस्वी झाला असून आगामी काळात उत्पादनाच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.