RBI Repo Rate | महागाईसाठी (Inflation) तुम्हाला आता सज्ज रहावे लागेल. घाऊक महागाई कमी झाली आहे. जुलैमध्ये हा दर 13.93 टक्क्यांवर घसरला. महागाई पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे. तरीही महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक (RBI) पुन्हा रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याच्या विचारात आहेत. एकीकडे चलनवाढीचा दर कमी होऊ शकतो. पण कर्जावरील हप्ता मात्र कमी होणार नाही. तुम्हाला जादा ईएमआय (EMI) मोजावा लागेल. रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्टच्या धोरण आढावा बैठकीपूर्वीच, मध्यवर्ती बँकेने महागाई नियंत्रणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात केंद्रीय बँक दर वाढवण्याची दाट शक्यता असल्याचा अंदाज जर्मनीच्या ड्यूश बँकेने (Deutsche Bank) वर्तवला आहे. आता हा दर किती असेल हे पुढच्याच महिन्यात कळेल. पण रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करणार हे निश्चित असल्याचे मानण्यात येत आहे.
भारतीय रिझव्र्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती (MPC) दरवाढीचा निर्णय घेते. ही समिती दर वाढीची गती आणखी कमी करू शकते, असा ड्यूश बँकेचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँक सप्टेंबरच्या चलनविषयक आढाव्यात रेपो दर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवू शकते, असे ड्यूश बँकेचे मत आहे. केंद्रीय बँकेने या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. चलनवाढ रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या वर कायम आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँकेने धोरणात्मक दरांमध्ये तीन वेळा 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँक ऑफ जर्मनीने (Bank of Germany) एका अहवालात म्हटले आहे की, येथून रिझर्व्ह बँक व्याजदर वाढीचा वेग कमी करेल. चलनविषयक धोरण समितीच्या शेवटच्या बैठकीचा तपशील नुकताच आला आहे. त्यात महागाई नियंत्रणास प्राधान्य देण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने महागाई आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यानंतर अनेक वस्तूंच्या दरात घसरण झाली. खाद्यतेलाचे दर घसरले. परिणामी घाऊक महागाई कमी झाली आहे. जुलैमध्ये हा दर 13.93 टक्क्यांवर घसरला. महागाई पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे. तरीही महागाई रोखण्यासाठी आरबीआय पुन्हा रेपो रेट वाढवण्याच्या विचारात आहेत. किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात 7 टक्क्यांच्या खाली आला आहे. तरीही हा दर रिझर्व्ह बँकेच्या निर्धारीत दरापेक्षा जास्त आहे. चलनवाढीचा दर 2 ते 6 टक्क्यांच्या श्रेणीत ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे आणि 2023 च्या सुरुवातीला महागाई दर उद्दिष्ठ गाठण्याची शक्यता आहे.