आजही मोठ्या संख्येने भारतीय नागरिक टपाल खात्याच्या (Post Office) अल्पबचत योजनेत गुंतवणूक करतात. पोस्ट खात्याविषयी गुंतवणुकदारांच्या (Investor) मनात विश्वास आणि ओलावा दोन्ही ही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोस्ट ऑफिसने नागरिकांना अल्पबचतची सवय लावली. त्यातून नंतर मोठी रक्कम उभी राहत असल्याने नागरिकांनी अनेक अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. दुसरीकडे झटपट श्रीमंतीचे ही अनेक साधने आणि माध्यमं उपलब्ध आहेत. पण त्या ठिकाणी तुमच्या रक्कमेची कोणी ही हमी देत नाही. कोरोना महामारीनंतर रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक अर्थससत्तांवर आर्थिक संकट ओढावले आहे. गुंतवणूकदारांचे बाजारात पैसे गुंतवून मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे गुंतवणुकदार जोखीम मुक्त गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. त्यांना गुंतवणुकीसाठी बँक एफडी (FD Scheme), एलआयसी (LIC), पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना (Small Saving Scheme) हा चांगला पर्याय आहे.
पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर किसान विकास पत्र हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या अल्पबचत योजनेत बचतीची सवय तर लागतेच परंतू, ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवल्यास, तुम्हाला गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळते. जर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट करायचे असतील तर या योजनेतील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. काही वर्षांतच गुंतवणुकदाराची रक्कम दामदुप्पट होते. या योजनेत फसवणुकीची वा रक्कम कमी होण्याची कसली ही भीती नसते.
किसान विकास पत्राद्वारे, तुम्हाला पोस्ट ऑफिसवर वार्षिक आधारावर 6.9टक्के व्याजदर मिळतो.हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. यानंतर तुमची मूळ रक्कम 124 महिन्यांत म्हणजे 10 वर्षे 4 महिन्यांत दुप्पट होईल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बाजारातील जोखमीपासून दूर राहून उच्च परतावा देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल, तर किसान विकास पत्र योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
किसान विकास पत्र योजनेत एखादी व्यक्ती किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकते. या योजनेत तुम्हाला 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एक प्रौढ आणि तीन प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. या योजनेत पालक अल्पवयीन अथवा बाळबोध, भोळसर व्यक्तीच्या नावेही खाते उघडता येते.
कालावधीया योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.
किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.