Car Racer Dies: रेसिंग ट्रॅकवर आयुष्याचा शेवट, भारतात झालेल्या भीषण अपघाताचा VIDEO आला समोर

| Updated on: Jan 09, 2023 | 11:09 AM

Car Racer Dies: नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दरम्यान हा भीषण अपघात झाला. यात प्रसिद्ध रेसर केई कुमारचा मृत्यू झाला.

Car Racer Dies: रेसिंग ट्रॅकवर आयुष्याचा शेवट, भारतात झालेल्या भीषण अपघाताचा VIDEO आला समोर
Car Race accident
Image Credit source: Screengrab
Follow us on

चेन्नई: नॅशनर कार रेसिंग चॅम्पियनशिप दरम्यान एक दुर्देवी घटना घडली. चेन्नईत रविवारी 8 जानेवारीला ही रेसिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत दरम्यान झालेल्या कार अपघातात प्रसिद्ध रेसर केई कुमार यांचा मृत्यू झाला. केई कुमार 59 वर्षांचे होते. अपघातानंतर रेस दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. केई कुमार मद्रास मोटर्स स्पोर्ट्स क्लबचे आजीवन सदस्य होते. मद्रास इंटरनॅशनल सर्किटमध्ये ही रेसिंग इवेंट आयोजित करण्यात आली होती.

कार ट्रॅक बाहेर गेली

स्पर्धा सुरु असताना, सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. केई कुमार यांची कार दुसऱ्या स्पर्धकाच्या कारला धडकली. या धडकेमुळे केई कुमार यांची कार ट्रॅक बाहेर गेली, झुडूपाला धडकून पलटी झाली. रेड फ्लॅग दाखवून तात्काळ रेस थांबवण्यात आली. काही मिनिटात केई कुमार यांना कार बाहेर काढण्यात आलं.

सर्वप्रथम ट्रॅकवरच्या मेडीकल सेंटरमध्ये उपचार

केई कुमार यांना सर्वप्रथम ट्रॅकवरच्या मेडीकल सेंटरमध्ये तपासण्यात आलं. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांना वाचवता आलं नाही. रेसच्या आयोजकांनी केई कुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलय.


ही दुर्भाग्यपूर्ण घटना

“ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. ते अनुभवी रेसर होते. अनेक दशकापासून मित्र आणि स्पर्धक म्हणून मी त्यांना ओळखतो” असं विक्की चंडोक म्हणाले. एमएमएससी आणि अन्य रेसर्सनी केई कुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलय.