WTC Final 2023 आधी ICC कडून नियमात मोठा बदल

| Updated on: May 15, 2023 | 3:43 PM

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने नियमामध्ये बदल केला आहे. जाणून घ्या.

WTC Final 2023 आधी ICC कडून नियमात मोठा बदल
Follow us on

दुबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्यात येणार आहे. हा महामुकाबला 7 ते 11 जून रोजी लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल इथे आयोजित करण्यात आला आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. या सामन्याला आता अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. आयपीएल 16 वा मोसम संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू हे इंग्लंडला रवाना होतील. या हायव्होल्टेज सामन्याच्या काही दिवसांआधी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम हा या फायनल मॅचवर होणार आहे. हा नक्की निर्णय काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

आयसीसीने या महाअंतिम सामन्याच्या 20 दिवसआधी नियमात मोठा बदल केला आहे. या नियमामुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना फायदा होणार आहे. मात्र हा नियम पंचासाठी आहे, पण याचा परिणाम टीमवर होणार आहे.

आयसीसीने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असा आहे. याआधी नियमावरुन अनेक दिग्गजांनी आक्षेप घेतला होता. या नियमाचा अनेक खेळाडूंना फटका बसला होता. त्यामुळे या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर होता. नक्की कोणता आणि काय बदल झाला, जाणून घेऊयात.

सॉफ्ट सिग्नल ‘आऊट’

साधारणपणे फिल्ड अंपायरला निर्णय देण्यात अडचण आल्यास त्यात थर्ड अंपायरची मदत घेतली जाते. बॅट्समन कॅच आऊट आहे की नाही, रनआऊट, फोर आहे की सिक्स याबाबतचे अनेक बारीक आणि निर्णायक अशा निर्णयांमध्ये फिल्ड अंपायर थर्ड अंपायरची मदत घेतो.

मात्र त्याआधी फिल्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल द्यावा लागतो. म्हणजे काय, तर त्याबाबत फिल्ड अंपायरला काय वाटतं, हे जाहीर करावं लागतं. म्हणजे समजा बॅट्समन कॅच आऊट आहे, पण फिल्ड अंपायरला त्याबाबत थोडी शंका असेल, तर तो आधी आऊट असल्याचं जाहीर करतो, मग थर्ड अंपायरकडे जातो.

त्यानंतर पुढे थर्ड अंपायर फिल्ड अंपायरने दिलेल्या निर्णयाच्या अनुषगांने तंत्रज्ञानाचा वापर करुन अचूक निर्णय देतो. मात्र अनेकदा निर्णय घेण्यात थर्ड अंपायरचा कस लागतो. त्यामुळे थर्ड अंपायर फिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम जाहीर करतो, तोच निर्णय कायम ठेवतो. त्यामुळे होतं काय, तर फिल्ड अंपायरने अंदाजपंचे दिलेला निर्णय हा अंतिम ठरतो, जो कधीकधी चुकीचाही असतो. त्यामुळे संबंधित खेळाडूसह टीमला नुकसान सहन करावं लागतं. मात्र असं आता होणार नाही.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आता फिल्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची सक्ती नसेल. त्यामुळे आता जो काही पेचात्मक निर्णय असेल, त्याबाबत थर्ड अंपायरच अंतिम निर्णय घेईल. याबाबत आयसीसीच्या शिष्ठमंडळाने यावर दीर्घ चर्चा केली. त्यानंतर या नियमात बदल केल्याचं म्हटलं आहे. मात्र आयसीसीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

या निर्णयाची अंमलबजावणी ही येत्या 1 जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे 7 जूनपासून सुरु होणाऱ्या wtc final 2023 साठीही हा निर्णय लागू असणार आहे.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.