मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली. गेल्या काही दिवसांपासून दुखापतग्रस्त असलेल्या खेळाडूंचंही कमबॅक झालं आहे. श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह फिट अँड फाईन झाले आहेत. तर केएल राहुल आशिया कप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धचा सामना खेळणार नाही. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. केएल राहुल ऐवजी संघात कोणाला स्थान मिळणार? त्याचबरोबर तिलक वर्मा डेब्यू करेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान संघ सध्या चांगलाच फॉर्मात असून टीम इंडियाची या सामन्यात चांगलीच कसोटी लागणार आहे. आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 3-0 ने धुव्वा उडवला आहे. तसेच आयसीसी वनडे क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी योग्य रणनिती आखावी लागणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा याला पाकिस्तान विरुद्ध योग्य खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. अन्यथा पाकिस्तानी संघ टीम इंडियावर भारी पडू शकतो. पाकिस्तानला पराभूत केल्यास टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर टॉप फोर फलंदाजांची जबाबदारी असेल.
मिडल ऑर्डरमध्ये केएल राहुलच्या उपस्थितीत इशान किशनला संधी मिळेल. तसेच हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत पाचव्या स्थानावर उतरेल. सहाव्या स्थानावर रवींद्र जडेजा याला संधी मिळेल. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव, तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यावर असेल.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.