मुंबई | टीम इंडियासाठी पुढील काही महिने फार महत्त्वाचे आहेत. आशिया कप आणि त्यानंतर टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. टीम इंडियाला 2011 पासून वर्ल्ड कप आणि 2013 पासून आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यात यंदा भारतात वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची 12 वर्षांपासूनची वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा ही संपेल, अशी आशा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला आहे. रोहित शर्मा याला आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला मोठ्या स्पर्धेत विजय मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे रोहितसाठी कॅप्टन म्हणून आशिया कप आणि वर्ल्ड कप या दोन्ही स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.
रोहितने आतापर्यंत आपल्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत धमाकेदार कामगिरी केली आहे. मात्र आता रोहितने या 2 महत्त्वाच्या स्पर्धेआधी मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे रोहित शर्मा वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर करु शकतो. रोहितने आगामी वर्ल्ड कपआधी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. “मला या टीमसोबत पुढील 2 महिन्यात असंख्य आठवणी तयार करायच्या आहेत”, अशी प्रतिक्रिया रोहितने पीटीआयसोबत बोलताना दिली. रोहितच्या प्रतिक्रियेमुळ तो वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार असल्याचा कयास बांधला जात आहे.
रोहितने 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये खऱ्या अर्थाने चमकदार कामगिरी केली होती. रोहितने तेव्हा 5 शतकांसह 648 धावा केल्या होत्या. रोहित 2019 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच रोहितने 2019 वर्ल्ड कपमधील कामगिरीला उजाळा दिला.
“मी तणावमुक्त कसा राहतो हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी माझी भूमिका बजावताना बाह्य घटकांबाबत विचार करत नाही. माझी 2019 वर्ल्ड कपच्या आधीच्या काळात परतण्याची इच्छा आहे. माझी तेव्हा मानसिकरित्या चांगली स्थितीत होती. मी तेव्हा वर्ल्ड कप 2019 साठी चांगली तयारी केली होती. मी एक खेळाडू आणि व्यक्ती म्हणून 2019 वर्ल्ड कपआधी काय योग्य करत होतो, हे आठवण्याचा प्रयत्न करतोय. मी वैयक्तिक पातळीवर पुन्हा त्याच विचारधारेवर लक्ष केंद्रीत करु इच्छितो”, असं रोहित म्हणाला.
रोहित शर्मा याने टीम इंडियाचं 52 कसोटी, 244 वनडे आणि 148 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. रोहितने वनडेत 9 हजार 837, कसोटीत 3 हजार 677 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 3 हजार 853 रन्स केले आहेत.