मुंबई : रेड कार्ड म्हटलं की सर्वांना फुटबॉल आठवतो, रेड कार्ड म्हटलं की संंबंधित खेळाडूला नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सामन्याबाहेर जावं लागतं. आता हेच रेड कार्ड क्रिकेट या खेळामध्ये आलं आहे. इतकंच नाहीतर या रेड कार्डचा एक खेळाडू शिकार ठरला आहे. हा रेड कार्डचा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाहीतर प्रसिद्ध क्रिकेट लीगमध्ये लागू करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीगचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून केलं जात आहे. या वर्षी या लीगमध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. तो म्हणजे ‘ रेड कार्ड ‘. फुटबॉलप्रमाणे आता ‘सीपीएल’मध्ये रेड कार्डचा वापर केला गेलाय. त्रिनिबागो नाइट रायडर्स आणि सेंट किट्स नेविस या दोन संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात नियमांचं उल्लंघन केल्याने अंपायर्सकडून रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यामुळे नाइट रायडर्स संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 खेळाडूंसह खेळायला लागलं. याप्रकरणी त्रिनिबागो नाइट रायडर्सचा कर्णधार कायरन पोलार्ड याने अंपायरने दिलेल्या रेडकार्डच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
त्रिनिबागो नाइट रायडर्स आणि सेंट किट्स नेविस यांच्यात सुरु असलेल्या सीपीएल 2023 मधील सामन्या दरम्यान, पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या त्रिनिबागो नाइट रायडर्स या संघाने निर्धारित वेळेच्या आधी 19 ओव्हर टाकून पूर्ण न केल्याने सीपीएल मधील नवीन नियमानुसार 20व्या ओव्हरमध्ये अंपायर्सद्वारे रेड कार्ड दाखवण्यात आलं. रेड कार्ड दाखवल्याने 20व्या ओव्हरमध्ये केवळ 10 खेळाडूचं मैदानात राहू शकतात. अशी परिस्थिती उद्भवली असता कर्णधार कायरन पोलार्डनं सुनील नारायणला बाहेर जाण्यास सांगितलं. त्यामुळे सुनील नारायण हा रेडकार्ड लागू झालेला क्रिकेट विश्वातील पहिला खेळाडू बनला आहे.
सामना निर्धारित वेळेत पू्र्ण व्हावा यासाठी आयसीसीने काही नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांत लागू केले आहेत. जर गोलंदाजी करत असलेल्या संघाने निर्धारित वेळेच्या आधी 19 ओव्हर टाकून पूर्ण केल्या नाहीत तर, 20 व्या ओव्हरमध्ये 5 ऐवजी केवळ 4 फिल्डरचं सीमारेषेवर ठेवता येतात. तर अनेकदा कर्णधारांच्या मॅच फी मधील काही टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते.
दरम्यान, आता सीपीएलमध्ये फुटबॉलप्रमाणे रेड कार्ड दाखवण्यात आलेलं आहे. तर सुनील नारायण हा क्रिकेट विश्वातील पहिला रेड कार्ड लागू झालेला खेळाडू ठरला आहे. अशा प्रकारचे नियम सीपीएलनंतर आयसीसी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू करु करणार की नाही? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले आहेत.