इस्लामाबाद | आशिया कप 2023 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. आशिया कप 2023 वनडे फॉर्मेट पद्धतीने पार पडणार आहे. एकूण 6 टीम्स आशिया कपसाठी मैदानात एकमेकांच्या आमनेसामने असणार आहेत. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवण्यात येणार आहे. या 13 पैकी 9 सामने हे श्रीलंका आणि उर्वरित 4 सामने पाकिस्तानमध्ये होणार आहे. आशिया कपसाठी टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहाही संघ सज्ज आहेत. आशिया कपनंतर क्रिकेट महाकुंभाला म्हणजेच आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
आयसीसीने या वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक हे काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार एकूण 9 सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. विविध कारणांमुळे हा बदल करण्यात आला. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. पीसीबीने आज 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान क्रिकेट टीमच्या वर्ल्ड कपसाठी नवी जर्सीचं अनावरण केलं आहे. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमच्या नव्या जर्सीचे फोटो हे आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पीसीबीने नव्या जर्सीतील बाबर आझम, शादाब खान आणि मोहम्मद नसीम या तिघांचे फोटो शेअर केले आहेत. या तिघांसह अन्य खेळाडूही नव्या जर्सीत आहेत. पाकिस्तानच्या वर्ल्ड कप स्पेशल जर्सीबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
पाकिस्तान क्रिकेट टीमची नवी जर्सी
Pakistan’s official Star Nation Jersey for ICC @cricketworldcup 2023 🌟
Describe our kit with an emoji 👇
Pre-order at https://t.co/TWU32Ta9wL#WearYourPassion pic.twitter.com/JZzrXXwabo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 28, 2023
दरम्यान 4 ऑक्टोबर रोजी आयसीसी वनडे वर्ल्ड कप ओपनिंग सेरेमनी पार पडणार आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागून आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे.