मुंबई : आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयलस चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यामध्ये मोठा राडा झालेला आपण पाहिला. स्टार खेळाडू विराट कोहली आणि माजी खेळाडू गौतम गंभीर भर सामन्यामध्ये भिडले. दोन दिग्गज खेळाडू मैदानामध्ये ऑन कॅमेरा भिडल्याने क्रिकेट वर्तुळात त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. अनेक आजी माजी खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया देताना एका कोणाला दोष न देता असा प्रकार नाही व्हायला पाहिजे. क्रिकेटसाठी हे चांगलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. अशातच टीम इंडियाला दोन्ही वर्ल्ड कप मिळवून देण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारा माजी खेळाडू युवराज सिंह याने रोखठोकपणे मत मांडत या वादामध्ये उडी घेतली आहे.
युवराज सिंह दोन्ही खेळाडूंसोबत म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्याबर क्रिकेट खेळला आहे. दोघांसोबत त्याने ड्रेसिंग रूमही शेअर केली आहे. विराट कोहलीला युवराज सिंह तसा सिनिअर खेळाडू तर गौतम गंभीर त्याचा सहकारी खेळाडू होता. युवराजने या वादावर बोलताना कोणताही दुजाभाव न करता दोघांचंही नाव घेत त्यांना एक सल्ला दिला आहे.
युवराज सिंहने या मुद्द्यावर एक मजेशीर ट्विट केलं आहे. यामध्ये, स्प्राइट या कोल्ड ड्रिंग ब्रँडला टॅग करत, मला वाटतं या ब्रँडला गौती आणि चीकूने आपल्या कॅम्पेनसाठी साईन करायला हवं, असं युवराज सिंहने ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच युवीने आपल्या ट्विटमध्ये दोघांना टॅग करत शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.
I think #Sprite should sign #Gauti and #Cheeku for their campaign #ThandRakh ?? what say guys? ? @GautamGambhir @imVkohli @Sprite
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) May 4, 2023
युवराज सिंग टीम इंडियामधील सर्वात खोडकर, मस्तीखोर आणि जॉली खेळाडू असल्याचं क्रिकेट जगताला माहित आहे. युवीने संघात असताना केलेली मस्ती इतर खेळाडूंनी मुलाखतीमध्ये सांगितली आहे. युवराज सिंगने आता या वादावर बोलताना थेट दोन्ही खेळाडूंनी शांत राहण्याचा सल्ला दिला असला तरी विराट आणि गंभीर ऐकतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.