मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील जर तरच्या गणितात अखेर मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. मुंबईने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादला पराभूत करून दोन गुणांची कमाई केली. या सामन्यात कॅमरून ग्रीन विजयाचा शिल्पकार ठरला. ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून ग्रीनने 47 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या आक्रमक खेळीमुळे मुंबईने 201 धावांचं आव्हान 18 षटकातच पूर्ण केलं. आयपीएल 2023 स्पर्धेतील हे सर्वात वेगवान शतक आहे. पण कॅमरून ग्रीनचा फॉर्म पाहून रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. कारण आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आहे. कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहे. तर रोहित शर्माकडे टीम इंडियाचं कर्णधारपद आहे.
कॅमरून ग्रीनच्या शतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्स 2022 नंतर आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचली आहे.पण त्याच्या खेळीमुळे भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचं टेन्शन वाढलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एशेज मालिका होणार आहे. त्यामुळे इंग्लंडची धाकधूक वाढली आहे. ग्रीनचा हाच फॉर्म कायम राहिला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची डोकेदुखी वाढेल.
कॅमरून ग्रीनने 47 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीमध्ये 8 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आयपीएस संपल्यानंतर रोहित शर्माला भारतीय संघासाठी खास रणनिती आखावी लागेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.