मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची आशिया कप स्पर्धेत कसोटी लागणार आहे. आशिया कप स्पर्धेसाठी 17 सदस्यीय टीमची घोषणा झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंना या स्पर्धेत आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. कारण याच चमूतून वर्ल्डकपसाठी 15 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. म्हणजेच काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल आणि 19 नोव्हेंबर 2023 स्पर्धेतील अंतिम सामना असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाला गेल्या दहा वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. कारण गेल्या दहा वर्षात टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेत एकही जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेसोबत वनडे वर्ल्डकप संघाबाबत खलबतं सुरु झाली आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्मा याने संघ निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्मा याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू स्पष्ट केली. “जर संघात कोणाला संधी मिळाली नाही तर त्यामागे काही कारण असतात. याचा अर्थ असा नाही की, त्याला पसंत केलं जात नाही. कर्णधाराची वैयक्तिक आवड आणि नाआवड याचा येथे प्रश्नच उद्भवत नाही. जर एखादा खेळाडू टीमबाहेर असेल तर त्यामागे काही कारणं आहेत. त्यात मी काहीच करू शकत नाही.”, असं रोहित शर्मा याने स्पष्टपणे सांगितलं.
रोहित शर्मा याने वर्ल्डकपच्या त्या कटू आठवणींना उजाळा दिला. रोहित शर्मा 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात नव्हता. त्यामुळे त्याने आपलं दु:ख व्यक्त केलं. रोहित शर्मा याने सांगितलं की, “माझी संघात निवड झाली नव्हती म्हणून मी दु:खी होतो. काही खेळाडू आपला निश्चित ठेवून विचार करत असतात. जेव्हा 2011 च्या संघात मी नव्हतो तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं आणि एका खोलीत स्वत:ला बंद करून ठेवलं होतं. तेव्हा युवराज सिंग याने माझी समजूत काढली होती. युवराज मला डिनरवर घेऊन गेला. तसेच पुढे खेळण्यासाठी बऱ्याच संधी असल्याचं सांगितलं. तसेच आपला खेळ सुधारून पुनरागमन करू शकतो, असं युवराज सिंग म्हणाला होता होतं.”