मुंबई : 29 ऑगस्ट 2023 | आशिया कपसाठी 24 तासांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. उद्यापासून म्हणजेचं 30 ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. आशिया कपमधील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान हायवोल्टेज सामना 2 सप्टेंबरला श्रीलंकेतील कॅन्डी या क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. पण या आधीच एका संघातील 4 खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेल्याने टीमची आशिया कपसाठीची डोकेदुखी चांगलीचं वाढली आहे.
2022 साली झालेल्या टी-20 आशिया कपमध्ये या संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला धुळ चारतं आशिया कपवर आपलं नाव कोरलं होतं. हा संघ दुसरा तिसरा कोणी नसून श्रीलंका आहे. पण या वर्षी श्रीलंकेला आशिया कप डिफेंड करणं जास्तचं जड जाणार आहे. कारण आशिया कपआधीच श्रीलंकेच्या ताफ्यातून वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंकेतील 4 खेळाडू आशिया कपआधीचं संघातून बाहेर झाले आहेत.
SPL मध्ये अष्टपैलू कामगिरी करुन आपल्या संघाला विजयाच्या शिखरावर नेवून ठेवलेला श्रीलंकेचा स्टार खेळाडू वानिंदु हसरंगा, वेगवान गोलंदाज दुश्मंता चमिरा, डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका आणि लहिरु कुमारा हे श्रीलंकेचे चार खेळाडू दुखापतीमुळे आशिया कप 2023 मध्ये खेळणार नसल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार मिळाली आहे.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदु हसरंगा हा गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेसाठी मोठा मॅचविनर ठरला आहे. हातातून निसटलेले अनेक सामने हसरंगाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या बळावर लंकेच्या बाजूने झुकवले आहेत.
दरम्यान, टीम इंडिया, पासकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानसारखे तगडे संघ आशिया कपमध्ये आमने-सामने येणार आहेत. मात्र श्रीलंकेचे मुख्य खेळाडूला दुखापती झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.