मुंबई : IPL 2023 मध्ये रविवारचा दिवस खूप महत्वाचा होता. कारण या दिवशी प्लेऑफमध्ये दाखल होणारा चौथा संघ कुठला? ते ठरणार होतं. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादमध्ये झाला. दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा झाला. मुंबईला प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी SRH वर मोठ्या फरकाने विजय मिळवणं आवश्यक होतं. मुंबईला हैदराबादवर मोठ्या फरकाने विजय मिळवता आला नाही. पण त्यांनी सामना जिंकला.
त्यानंतर त्याचदिवशी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्समध्ये होणाऱ्या सामन्यावर RCB आणि मुंबईच्या फॅन्सचे डोळे लागले होते. कारण बँगलोरने गुजरातवर विजय मिळवला, तर RCB प्लेऑफमध्ये प्रवेश करणार होती, आणि ते हरले, तर मुंबईची टीम प्लेऑफमध्ये जाणार होती.
अखेर दुसरी शक्यता खरी ठरली
अखेर दुसरी शक्यता खरी ठरली. गुजरातने RCB ला हरवलं, त्यामुळे मुंबईची टीम प्लेऑफमध्ये गेली. या विजयाने मुंबईचे चाहते खूप आनंदात आहेत. पण RCB चे फॅन्स मात्र खूपच निराश आहेत. सामना गमावल्यानंतर विराट कोहली आणि मोहम्मद सिराजचे डोळे पाणावले. RCB हा स्टार प्लेयर्सनी भरलेला संघ आहे. पण मागच्या 15 वर्षात त्यांना एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.
शुभमन गिलचही वाईट चिंतन
ट्रॉफीशिवाय आता त्यांचं हे 16 व वर्ष असणार आहे. RCB च्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला होता. आरसीबीचे काही चाहते इतके खवळले होते की, त्यांनी शुभमन गिलचही वाईट चिंतन केलं. कारण शुभमन गिलच्या शतकी खेळीने आरसीबीची विजयाची संधी हिरावली. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचे चाहते मात्र खूप आनंदात होते.
‘तुमचं सगळ विराट कोहलीच्या जीवावर’
असाच एक रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मुंबईचे फॅन्स आरसीबी चाहत्याची खिल्ली उडवताना दिसतायत. तुमचं सगळ विराट कोहलीच्या जीवावर चाललय असं सुद्धा त्या चाहत्याला सुनावतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओने सर्वांच लक्ष वेधून घेतलय.