मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये क्रिकेटचे सेमीफायनल सामने कुठल्या चार संघांमध्ये होणार? ते निश्चित झालं आहे. भारत, यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या चार टीम्स मध्ये सेमीफायनल रंगणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा ज्या संघाविरुद्ध सामना आहे, त्यांनी टी 20 मध्ये एकदा, दोनदा नाही तर चक्क 17 वेळा भारतीय महिला संघाचा पराभव केलाय. भारतीय संघाला त्या टीम विरुद्ध फारसे सामने जिंकण जमलेलंच नाही. त्यामुळे टीम इंडियाचा कॉमनवेल्थच्या फायनल मध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नसेल. त्यांना फायनल मध्ये पोहोचण्यासाठी सर्वोत्तम क्रिकेट खेळावं लागेल. आधी काय झालं, ते विसरुन मैदानात उतरावं लागेल.
CWG मध्ये भारत सेमीफायनल मध्ये इंग्लंडला भिडणार आहे. दुसरी सेमीफायनल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होईल. दोन्ही सामने 6 ऑगस्टला होणार आहेत.
सेमीफायनल ते फायनल पर्यंतचा प्रवास भारतीय महिला क्रिकेट संघासाठी किती कठीण असेल, ते आकड्यांवरुन समजून घ्या. भारत आणि इंग्लंडच्या महिला संघात टी 20 मध्ये आतापर्यंत 22 सामने झालेत. त्यात 22 पैकी 17 वेळा इंग्लंडची टीम जिंकली आहे. फक्त 5 वेळाच भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे.
इंग्लंडचा संघ आपल्या घरात खेळतोय, ही सुद्धा त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. होम कंडीशन्सचा त्यांना फायदा मिळेल. इंग्लंडने मायदेशात भारताविरुद्ध 8 टी 20 सामने खेळलेत. त्यातही त्यांचा दबदबा कायम आहे. इंग्लंडने 6 तर भारताने 2 सामने जिंकलेत.