मुंबई: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी गुरुवारचा दिवस संमिश्र ठरला. भारतासाठी काही चांगल्या आणि काही निराशाजनक बातम्या आल्या. भारताची स्टार धावपटू हिमा दास 200 मीटर शर्यतीत आपल्या हीट मध्ये 23.42 सेकंदाची वेळ नोंदवून पहिली आली. तिने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. हिमा 22 वर्षांची आहे. पाच महिला धावपटूंच्या हीट मध्ये हिमा सुरुवातीपासूनच आघाडीवर होती. जाम्बियाच्या रोडा नजोबवुने 23.85 सेकंदाच्या वेळेसह दुसरं स्थान मिळवलं. युगांडाची जासेंट नायमहुंगे 24.07 सेकंदाच्या वेळेसह तिसरी आली.
महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वल 16 सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. हिमा हिट 2 मध्ये यशस्वी ठरली. हिट 1 मध्ये नायजेरियाची फेवर ओफिली (22.71 सेकंद) आणि हीट 5 मध्ये इलेन थॉम्पसन हेर (22.80 सेकंद) यांनी हिमापेक्षा सरस वेळ नोंदवली. हिमाच्या तुलनेत सहा खेळाडूंनी जास्त चांगली वेळ नोंदवली. त्या सेमीफायनल मध्ये पोहोचल्या आहेत.
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत महिला एकेरीत सहज विजय मिळवला. प्री क्वार्टरफायनल मध्ये प्रवेश केला. पीव्ही सिंधुने कॉमनवेल्थ स्पर्धेत राऊंड ऑफ 32 मध्ये मोठा विजय मिळवला. तिने मालदीवच्या फातिमा नाबाहवर 21-4, 21-11 असा सरळ गेम मध्ये विजय मिळवला. 21 मिनिटात तिने हा सामना निकाली काढला. सिंधुने एकतर्फी विजय मिळवला. प्रतिस्पर्धी फातिमाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.