मुंबई : हिंदू धर्माला पौराणिक कथा आणि रहस्यांचे भांडार म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण हिंदू धर्माशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही उलगडलेल्या नाहीत, त्यावर संशोधनही सुरू आहे. याशिवाय लोकांमध्ये अनेक प्रकारचे समज-गैरसमज आहेत, असाच एक विषय आहे हिंदू धर्मातील देवी-देवतांची संख्यांची. हिंदू धर्मात 33 कोटी (33 Koti God) देवी-देवता असल्याचे सांगितले जाते. यामागचे कारण असे की लोकं कोटी या शब्दाचा शाब्दिक अर्थ घेतात. मात्र खरंच देवांची संख्या इतकी आहे का?
शास्त्रात 33 कोटी नसून 33 कोटि देवतांचा उल्लेख आहे. कोटि या शब्दाचा अर्थ प्रकार म्हणजे हिंदूंचे 33 प्रकारचे देव आहेत. कोटि हा शब्दच बोलचालीच्या भाषेत करोड असा बदलला. त्यामुळे एकूण 33 कोटी देवता आहेत, अशी समजूत रूढ झाली. हिंदू धर्मात 33 कोटी देवता आहेत की 33 प्रकारचे देवता आहेत, या मुद्द्यावर बऱ्याच जणांचे मतभेद आहेत. या विषयावर अनेक अभ्यासक आणि तज्ज्ञांनी मतं व्यक्त केली असली तरी अजूनही लोकांमध्ये या विषयाबद्दल संभ्रम आहे. वास्तविक, या गोंधळामागील कारण म्हणजे कोटी या शब्दाचा अर्थ समजण्यात लोकांच्या चुका होतात.
33 कोटि देवतांमध्ये आठ वसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे. काही धर्मग्रंथांमध्ये 33 कोटी देवतांमध्ये इंद्र आणि प्रजापती यांच्याऐवजी दोन अश्विनीकुमारांचा समावेश करण्यात आला आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)