मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आजच्या मुलाखतीच्या शेवटच्या भागात भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. ते उपमुख्यमंत्री झाले आहेत, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना केला होता. त्यावर उपरवाले की मेहरबानी, असं उत्तर त्यांनी दिलं. हा उपरवाला त्यांचं त्यांना माहीत, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासोबत भाजप (bjp) असं का वागले हे त्यांचं त्यांना माहीत. मलाही समजले नाही. तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. भाजपमध्ये बाहेरच्या लोकांना सर्वकाही दिलं जातं. त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसं बसवली गेली. त्यावेळी वरच्या सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून बाहेरचा माणूस बसवला होता. आता मुख्यमंत्रीपदी बसवला आहे. इतर पदांवरही बाहेरचे लोक आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
दैनिक सामनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसिद्ध झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. येत्या ऑगस्टपासून राज्यात दौरे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्हाप्रमुखांना गेल्याच आठवड्यात काही सूचना दिल्या आहेत. जास्तीत जास्ती सदस्य नोंदणी आणि सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यानंतर मी लगेच ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करणार आहे. सदस्य नोंदणीची कामे थांबू नये म्हणून मी थांबलो आहे. पण मी फिरताना माझ्यासोबत सर्व नेते फिरतील. आम्ही संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहोत. आम्ही राज्यात वादळ निर्माण करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील जनतेच्या मनात शिवसेना आहे. शिवसेनेचं तुफान आहेच. लोकांच्या मनात आणि हृदयात शिवसेना आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेचं तुफान निर्माण होणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी मुंबईवर पुन्हा भगवा फडणारच असा दावा केला. या निवडणुकीनंतर शिवसेना राहणार नाही, असं अनेकांनी म्हटलं आहे. मुंबईकर एकवटले आहेत. हिंदूंमध्ये फूट पाडली जात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे. मराठी आणि अमराठी अशी फूटही पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पण त्याला कोणी बळी पडणार नाही. आम्ही आणि मुंबईकर फक्त निवडणुकीची वाट पाहत आहोत. मुंबईच्याच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात, असंही ते म्हणाले.
बंडखोरांनी आम्हाला गद्दार बोलू नका असं म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. मी त्यांना गद्दार नाही, विश्वासघातकी बोललो. त्यांचा मान ठेवला. त्यांना गद्दार नाही, विश्वासघातकी बोललो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.