मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना ईडीकडून (ED) अटक होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राऊत यांच्या अटकेनंतर पुढे काय करायचे याबाबतची रणनीती या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. शिवसेनेच्या इतरही नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांना ईडीकडून अटक होणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेत पडलेली फूट, कोर्टात सुरू असलेले खटले आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना अटक करण्यात आल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना रात्री पावणे एकच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षात खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढे काय करायचे? यावर चर्चा होणार आहे. तसेच राऊत यांना ईडीच्या कोठडीतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच ठरवून कारवाई केली जात असल्याने शिवसेनेत संतापाची लाट आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर काल सकाळी 7 वाजता ईडीने धाड मारली. तब्बल साडेनऊ तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर राऊत यांची दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. नंतर रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी राऊतांना अटक केली. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे.
राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राऊत यांच्या ऐकेकाळच्या सहकारी स्वप्ना पाटकर यांनी राऊतांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. स्वप्ना पाटकर यांना लैंगिक अत्याचार करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळ राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांची चांगलीच कोंडी झाली आहे.