मुंबईः फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) आधीच्या मंत्रिमंडळात त्यांना ज्युनियर असलेल्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. फडणवीसांनी उपमुख्यमंत्री (Deputy CM) पद स्वीकारलं. हा पूर्णपणे भाजपचा प्रश्न आहे. भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचं पालन केलं जातं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस वागले, यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांची कालच ईडीमार्फत दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण योग्य उत्तरे दिली. त्यांच्या प्रश्नांना मी अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे गेलो, दहा तासाने बाहेर आलो. पण गुवाहटीचा विचार मनात आला नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली. शिवसेनेतून आणखी काही खासदार फुटण्याच्या बातम्यांवरही त्यांनी वक्तव्य केलं. खासदारांशी शिवसेनाप्रमुखांशी चर्चा सुरु असून या फक्त अफवा पसरवल्या जात आहेत, असंही संजय राऊतांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान व्हावं लागलं, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ यावर मी काय बोलणार. मला तोंडात अजून उपमुख्यमंत्री येत नाही. माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण सतत आपण त्यांना बोलत राहिलो. पण उप हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला जड जात आहे. तरीही मी देवेंद्रजींच्या संदर्भात होत असेल तर त्यांचा हा पक्षाचा प्रश्न आहे. जे मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत होते. पक्षाची बैठक होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारा असं सांगितलं जातं. जे मुख्यमंत्री झाले ते त्यांच्या मंत्रिमंडळात ज्युनिअर होते. पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यासाठी..’
ईडीच्या चौकशीला जाताना मी तर बॅग भरूनच गेलो होतो, असं संजय राऊतांनी सांगितलं. ते म्हणाले,’ अशावेळी तू काही केलं नाही, असं आपला अंतरात्मा सांगत असतो. त्यामुळे निर्भिडपणे चौकशीला सामोरे जा. त्याच आत्मविश्वासाने गेलो. दहा तासाने बाहेर आलो. मलाही मार्ग होता गुवाहाटीला जाण्याचा. प्रयत्न झाले ना. पण आम्ही नाही गेलो. आम्ही ठाकरे शिवसेना यांच्यासोबत राहिलो. स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचं हे आमच्या रक्तात नाही. प्राण जाये पर वचन न जाये, हे बाळासाहेबांनी शिकवलं आहे. मी याबाबतीत बेडर आहे. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचे कारण नाही. हे मी इतरांना सांगत असतो. काल अधिकाऱ्यांना सांगितलं मी बॅग भरून आलो आहे. मी घाबरणार नाही. तुम्हाला हवे ते प्रश्न विचारा. अडचण नाही. तुम्ही तुमची ड्युटी करा. मी माझं कर्तव्य पार पाडतो. अशा पद्धतीने कालचा दिवस गेला.
काही लोकांकडून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स लावून त्यावरून उद्धव ठाकरेंचा फोटो गायब केला जातोय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ लोकांना भ्रमिष्ट केलं जात आहे. ही भाजपची स्टॅटेजी आहे. त्याच पद्धतीने शिवसेनेतून पडलेले लोक तसे करत आहेत. शेवटी या राज्यातील जनता आणि शिवसैनिक दुधखुळे नाहीयेत. पण त्यावर चर्चा न करता नवीन राज्य आलं आहे. नवीन विटी नवीन दांडू… त्यांनी त्याचं काम करावं. महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईची ताकद कमी करायची आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर त्यांना बंदूक ठेवू दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे राज्यातील जनतेला सांगायला हवं की मुंबईवर शिवसेनेचाच भगवा राहील. पण नाही त्यांना शिवसेनेचा पराभव घडून आणण्यासाठीच मुख्यमंत्री केलं आणि मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. हे हळूहळू स्पष्ट होईल’