रत्नागिरी : बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरुन महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) आणखी तापण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला काही स्थानिकांकडून विरोध केला जातोय. विशेष म्हणजे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आज स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी जमिनीवर झोपून आंदोलन केलं. या आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. खरंतर सध्याच्या घडीला प्रशासनाकडून मातीचं सर्व्हेक्षण सुरु आहे. तिथली माती प्रकल्पासाठी अनुरुप आहे की नाही, याबाबत चाचपणी केली जात आहे. पण या सर्व्हेक्षणालादेखील काही स्थानिकांनी विरोध केलाय. स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटात हालचाली वाढल्या आहेत.
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आज शिवसेनेच्या ठाकरे गटात हालचाली वाढल्या. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, तसेच काय निर्णय घेण्यात आले, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ठाकरे गट कोकणात मोठं आंदोलन उभारणार आहे. कोणत्याही परिस्थितीत बारसू सोलगाव रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांसोबत ठाम राहायचं, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय.
रिफायनरीला विरोध म्हणून मोठं जन आंदोलन उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत स्थानिकांसोबत कायम राहण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रकल्पाला रद्द करण्यासाठी किंवा स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत जाऊन कोणाशी चर्चा करण्यात अर्थ नाही. लोकांसोबत राहूयात, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकल्पावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. रिफायनरीचा शासन निर्णय झाला आहे. त्यानुसार काम सुरु आहे. जर त्या ठिकाणच्या काही लोकांचा विरोध असेल तर त्यांचही म्हणणं ऐकून घेतलं जाईल. याचमध्ये बदल करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. तेच या विषयाबाबत निर्णय घेतील, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. तसेच खासदार संजय राऊत काय बोलू लागले याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, असं सत्तार यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक शब्दांत टीका केलीय. “उद्धव ठाकरेंची ही सवयच आहे. उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या ज्या प्रकल्पांना आधी विरोध केला, काही काळानंतर तेच त्याच्या समर्थनासाठी उतरले आहेत. उद्धव ठाकरेंच्या विरोधाची किंमत ज्यादिवशी मोजली जाईल त्यादिवशी त्यांचे समर्थन मिळेल. उद्धव ठाकरेंना आपली किंमत वाढवायची असून चेकवरचे आकडे वाढवायचे आहेत. त्यासाठी त्यांचे राज्यपालांना वगैरे भेटणार हे चाललंय”, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.
“ज्यादिवशी उद्धव ठाकरेंचा आकडा वाढेल त्या दिवशी त्यांचा बारसु रिफायनरीला विरोध कमी होईल. मातोश्री एकचे दोन झाले आहेत. खर्च वाढलेला आहे. मुलांची लग्ने करायची आहेत म्हणून हे विरोध करायला लागतात”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.