मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (cm eknath shinde) अत्यंत तिखट शब्दात डिवचले आहे. एकनाथ शिंदे माझ्यापासून दूर गेले हे बरं झालं. माझा असंगाशी संग गेला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. तसेच ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या यंत्रणांकडून माहिती घेऊनच बोलावं, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना (shivsena) एकत्र आली आहे. दोन्ही पक्ष सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही कार्यरत राहणार आहेत. दोन्ही पक्ष निवडणुकांच्या मैदानातही उतरणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रं आल्याने महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णपणे बदलून जाणार आहे. या युतीच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी आपली मते मांडली.
तुम्ही मुख्यमंत्र्यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हणाला होतात. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे, याकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हटलं नव्हतं. मुख्यमंत्री कोणी असलं तरी त्यांची संदेश यंत्रणा चांगली पाहिजे. कंत्राटीपद्धतीने नोकरभरती करण्याचा केंद्राचा निर्णय होता. त्यावर मी म्हटलं पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही कंत्राटी पद्धतीवर का नेमू नये? टेंडर काढा आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना नेमा. असं माझं विधान आहे, असं सांगतानाच बरं झालं. ते माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे माझा असंगाशी संग गेला. जाऊ दे. त्यावर बोलायचं नाही. त्यांनी त्यांच्या इतरवेळेला हेर यंत्रणा कार्यरत असतात. त्यामुळे त्यांनी माहिती घेऊन बोलावं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
गेले अडीच वर्ष आमच्याच लोकांनी खाल्लं. ते जर नसतं घडलं तर पाच वर्ष काँग्रेससोबत यशस्वी सरकार चालवलं असतं. अडीच वर्ष आम्ही काँग्रेससोबत चांगल्या पद्धतीने कारभार केला. काँग्रेसचा सर्वधर्म समभाव आहे आणि आमचं हिंदुत्व. हे आम्ही केलं ना एकत्र. यात मतभिन्नता पेक्षा मत ऐक्य किती आहे? याचा आम्ही विचार करतो. दोन्ही पक्षाची समन्वय समिती असलं पाहिजे. आपलं मत ऐक्य कुठं आहे, त्यापेक्षा मत भिन्नता कुठं आहे. त्यावर विचार करू. पुढे जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.
कडवट हिंदुत्व निष्ठ लेकरं एकत्र येतात याचा आनंद आहे. मी महाराष्ट्र फिरणार आहे. तूर्त मी मातोश्रीवरील गर्दी कमी केली आहे. मी संघटनेची बांधणी करत आहे. आता सणवार सुरू होत आहे. कोरोनाचं संकट होतं. त्यानंतर सण येत आहे. शेतकरी कामातून मोकळा होईल. या सर्व गोष्टी बघून दसऱ्याच्या अलिकडे किंवा पलिकडे मी लोकांशी बोलायला सुरुवात करेल. मी दौरा करेल, असं त्यांनी सांगितलं.