साताराः आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale) डॉल्बीवर (Dolbee) बंदी का घालताय, असा प्रश्न लावून धरलाय. दोन-तीन तास डॉल्बी वाजल्याने असे काहीही गंभीर परिणाम होत नाहीत, मग डॉल्बीवर बंदी घालून या उद्योगात गुंतवणूक करणाऱ्यांवर एवढा अन्याय का केला जातो, तुम्हाला बंदी घालायची तर ज्या गोष्टींमुळे कँसर होतो, अशा व्यवसायांवर आधी बंदी घाला, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय. दहीहंडीनिमित्त (Dahihandi) आज राज्यभरात भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आगामी काळात गणपती आणि नवरात्रीचे उत्सवही आयोजित केले जातील. मात्र या उत्सवांच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या डेसिबलच्या मर्यादेनुसार डॉल्बी वाजवा असे आदेश सर्वच जिल्ह्यात देण्यात आले आहेत. या प्रशासकीय आदेशाविरोधात उदयनराजे यांनी सवाल उपस्थित केलाय. यावर साताऱ्याच्या पोलीस निरीक्षकांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने डेसिमलच्या मर्यादेनुसार डॉल्बी वाजवा असे आदेश दिल्यानंतर सर्वत्र या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे याबाबत खासदार उदयनराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे… ते म्हणाले, डॉल्बीच्या व्यवसायात अनेक गरीबांनी गुंतवणूक केलेली असते. त्यांचाही विचार झाला पाहिजे. आज शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हुद्द्याप्रमाणे भरपूर वेतन मिळतं. लोकप्रतिनिधी सांगणारे कोण? या अँगलने कुणी बघणारे की नाहीत? डॉल्बीमुळे काही संकट आहे आणि विद्रुप असा प्रकार आहे, असं काही नाही… बाकीच्या व्यवसायांमुळे कँसर होतो, ते बंद करा आधी.. शासनाने उत्तर दिलंच पाहिजे… जिल्हा प्रशासनानं उत्तर दिलं पाहिजे. तसं पत्रक काढलं पाहिजे… डॉल्बी वाजलीच पाहिजे..
दरम्यान, सातारा पोलिसांनी मात्र डॉल्बीला परवानगी देता येणार नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार डेसिबलच्या मर्यादेनुसार साऊंड सिस्टम लावावेत, अशा सूचना दिल्या आहेत. कायद्याच्या नियमांत कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे सातारा शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी उत्सवात उंच थरावरून पडून मृत्यू झाल्यास सदर व्यक्तीच्या कायदेशीर वारसास 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचे यंदा जाहीर केले आहे. मात्र या खेळासाठी काही नियमही जाहीर केले आहेत. गोविंदांचे थर लावण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेची परवानगी आवश्यक आहे. आयोजक तसेच गोविंदांनी सुरक्षेची सर्व काळजी घ्यावी. मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास आयोजकांनी तत्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले आहे.