मुंबई – महाराष्ट्राची (Maharashtra) सूत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच (Delhi) हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच गली नव्हती. शिवसेना (shivsena) फोडणे व फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गुल आहेत. राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. मात्र त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मिताही गटांगळ्या खाताना दिसत आहे, हे गंभीर आहे. महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकट आहेच. पण सुलतानी संकटाने राज्य जास्त बेजार आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते. आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत. नाथांनी या संकटात ‘बये दार उघड’ अशी आरोळी ठोकून महाराष्ट्राचे मन जागे केले होते. आजचा महाराष्ट्र तसा जागाच आहे. तो पेटून उठेल अशी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीने दिल्लीस पोहोचले आहेत.
दिल्लीभेटीत त्यांनी मोदी-शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त झाले.
स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. शिंदे हे म्हणे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. हे आक्रित आहे. यापूर्वी शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाबरोबरच्या ‘युती’त होते; पण एकही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय व कसे करायचे याबाबत चर्चा करण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला.
मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आले व शिवसेनेच्या बारा खासदारासोबत त्यानी शक्तिप्रदर्शन केले व त्याआधी म्हणे या सर्व शक्तिमान खासदारांना केंद्र सरकारने ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. खासदारांच्या मतदारसंघातील घरे व त्यांची कार्यालये पोलिसानी वेदून ठेवली आहेत. या शक्तिमान, स्वाभिमानी खासदाराना इतके भय कोणाचे वाटत आहे? जनता आणि शिवसैनिक आपल्या सोबत असल्याचा दावा हे लोक करीत असतील व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे आम्हीच असे ते ‘बोलत असतील तर केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या वेढयात फिरण्याची गरज नाही, पण चोराच्या मनात चांदणे असा हा प्रकार आहे. आपण शिवसेनेशी, जनतेशी व महाराष्ट्राशी प्रतारणा करत आहोत ही जळजळ त्यांना अस्वस्थ करत आहे