मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज औरंगाबादेत जाहीर सभा होत आहे. संपूर्ण राज्यासह देशाचंही लक्ष या सभेकडे लागलं आहे. अशावेळी भीम आर्मीकडून (Bhim Army) ही सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादकडे जाणार होते. भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईवरुन औरंगाबादच्या दिशेनं निघाले होते. त्यावेळी घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. भीम आर्मीचे पदाधिकारी राज ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट देणार होते. राज ठाकरे संविधान मानत नाहीत. त्यामुळे त्यांनी संविधान भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. इतकंच नाही तर पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं राज ठाकरेंनी उल्लंघन केल्यास सभा उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांनी अशोक कांबळे यांना ताब्यात घेतलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत जरूर भाषण करावं. पण त्यांनी काही आक्षेपार्ह विधान केल्यास भर सभेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या नावाने जोरदार घोषणा देणार असल्याचा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी दिला होता. दरम्यान, अशोक कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असं असलं तरी राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादकडे निघाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. राज यांच्या सभेवर बंदी घालण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांनाच 1 लाखाचा दंड ठोठावला.
भीम आर्मी आणि अन्य काही संघटनांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिलाय. त्याबाबत मनसे नेते अविनाश जाधव यांना विचारलं असता, संविधानाचं स्वागतच आहे. मात्र, सभा उधळून लावण्याच्या धमक्या किंवा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आम्ही मारण्याची गरज नाही. तुम्ही या गर्दीत चिरडून मराल, असा इशाराच त्यांनी दिलाय. त्याचबरोबर तुम्ही विरोध करत असाल तर पुढील सभा आम्हाला तुमच्या घरासमोर घ्यावी लागेल, असंही जाधव म्हणाले.