पुणे | 24 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजित पवार यांनी 2 जुलैला भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीतील या फुटीची जोरदार चर्चा झाली. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? त्याची कारणं काय? असे सवाल उपस्थित होत असतानाच सुप्रिया सुळे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.
आपल्या देशात लोकशाही आहे आणि अजित पवार यांनी लोकशाहीत एक नागरिक म्हणून त्यांचा निर्णय घेतला. ते परत येतील की नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु आम्ही कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राजकारणात काहीही झालं तरी पवार कुटुंब परिवार म्हणून कायम एकत्र राहील असा मेसेज सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्यातून दिला आहे.
राष्ट्र्वादी पक्ष फोडण्याचा भाजपचा हा पहिलाच प्रयत्न नाही. तर याआधीही त्यांनी तीन वेळा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दोन वेळेला त्यांना यश आलं नाही. पण तिसऱ्यावेळी त्यांनी तगडी रणनिती आखली अन् अजित पवार त्यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
भाजपच्या 105 आमदारांबद्दल मला वाईट वाटतं. कष्ट घेऊन हे लोक निवडून आले. मी तिथं असते तर मला खूप वाईट वाटले असतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजित पवार गटाशी त्यांची लढाई वैचारिक सुरु आहे. मात्र कुटुंब म्हणून पवार एक आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काही दिवसांआधी शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी ही भेट झाली. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. लोकशाहीत कुणीही कुणालाही भेटू शकतं. पण आघाडी असेल तर मित्रपक्षांना उत्तरं द्यायला आपण बांधिल असतो. त्यामुळे आमचे मित्रपक्ष काँग्रेस आणि शिवसेना यांची जी मतं समोर येत आहेत.तीही चूक नाहीत. पण सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादी पक्षातील गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. पण दुसरा गट हा सत्तेत सहभागी नाही. पण, तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर पक्षात कोणतीही फूट नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.