मुंबई : आज विधिमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Monsoon Session) सहावा आणि शेवटचा दिवस आहे. आज सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि विशेषत: माजी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी त्यांच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळालं. यावर आदित्य ठाकरेंचं व्यंगचित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) घोड्यावर उलटे बसलेले दिसत आहेत. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली. पर्यवरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा विरोधकांकडून वारंवार देण्यात आल्या. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यापासून या घोषणेने विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. याच घोषणेवरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. याच घोषणेची सत्ताधाऱ्यांनीही री ओढली. खोके आणि ओकेचा संदर्भ घेत सत्ताधाऱ्यांनीही तश्याच अर्थाची घोषणाबाजी केली.
शिंदे गटातील आमदार आज विधिमंडळ परिसरात आक्रमक झाल्याचं दिसलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीला जोरदार प्रत्युत्तर दिलं. लवासाचे खोके एकदम ओके!, महसूलचे खोते, सोनिया ओके अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
विरोधकांच्या त्या घोषणेवर आक्षेप आहे. आम्ही एकही रुपया घेतलेला नाही. केवळ बाळासाहेबांचा विचार आणि आणि हिंदुत्वासाठी आम्ही भाजपसोबत गेलो, असं हे शिंदेगटातील आमदार सांगत आहेत. पण विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना त्यांनी आज घोषणाबाजीतून उत्तर दिलंय. सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला. साधे 50 रुपये जरी मी घेतलेले असलेले तरी मी राजीनामा देईन. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो”, असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले.