मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ऐ ‘भोगी’, कुछ तो सिख हमारे ‘योगी’ से! असं ट्वीट करत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यावर आता शिवसेना नेत्यांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र, अमृता फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी देवेंद्र फडणवीसांना एक वादग्रस्त प्रश्न विचायला. ‘योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं, ते योगी होण्यासाठी बायकोला सोडणार आहेत का?’ असा सवाल सय्यद यांनी केलाय. इतकंच नाही तर किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्लाबाबतही त्यांनी थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेत अजून एक वक्तव्य केलंय. त्यामुळे आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दीपाली सय्यद यांच्यावर पुण्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणि जळगावात तक्रार देण्यात आलीय.
अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली होती. त्यांनी ट्वीट करत ऐ ‘भोगी’, कुछ तो सिख हमारे ‘योगी’ से! अशा शब्दात शिवसेनेला डिवचलं आहे. त्यावर बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, अमृता फडणवीस यांनी एक वक्तव्य केलंय भोगी, योगी… त्यांना त्यातला काही फरक कळतोय का? योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. मी फडणवीसांना सांगेन की त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे. ते योगी होणार आहेत का? ते योगी होण्यासाठी आपल्या बायकोला सोडणार आहेत का?, असा सवाल त्यांनी केलाय.
इतकंच नाही तर किरीट सोमय्या यांच्या कारवर खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचं सय्यद यांनी समर्थन केलंय. ‘जेव्हा ती घटना घडली त्या वेळी प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर होता आणि हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला. जर तिथं त्या कारमध्ये मोदी असते तर त्या कारलाही तसंच फोडलं असतं. तुम्ही तिथं जाणार, या सगळ्या गोष्टी घडणार. पण तुम्ही हे केलंच कशाला? असं वादग्रस्त वक्तव्य दिपाली सय्यद यांनी केलंय.
दिपाली सय्यद यांच्या वक्तव्यानंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले आहेत. जर राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. मग सय्यद यांच्याविरोधातही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, त्यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा दरेकर यांनी दिलाय.