औरंगाबाद : शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या घरी ईडीने (ED) छापेमारी करून तब्बल 11 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यावर एकनाथ शिंदे अयोध्या असं लिहिलं असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे यांची अयोध्येच्या राम मंदिराला देण्याची ही रक्कम राऊतांनी घरात का ठेवली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर ते राऊतांनाच विचारा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात एकनाथ शिंदे यांची जाहीर सभाही पार पडली. यावेळी हजारो लोक उपस्थित होते.
संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव होते याची माहिती मला नाही. त्याची माहिती संजय राऊतच देऊ शकतात. अशा फालतू गोष्टीला मी घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला? असं संजय राऊत म्हणत होते. ते म्हणत होते की, माझी काही चूक नाही मी काहीच केले नाही. मग आता दूध का दूध पानी का पानी होईल. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला पाहिजे. ते आत गेलेत, पण ते चौकशीसाठी गेलेत. तुम्ही काय त्यांना आत घालवायला लागले की काय? राऊत यांची चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल आणि यामधून सत्य बाहेर येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. अजित दादा सत्तेतून बाहेर पडलेत. ते विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार का झाला नाही? असं म्हणणं हे विरोधकांचे काम असते. तसे दादा सूज्ञ आहेत. विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना काही गोष्टी बोलाव्या लागतात. दादांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः 24 तास 7 दिवस काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही अतिशय कमी वेळामध्ये शेतकऱ्यांसाठी, जनतेसाठी धडाडीचे निर्णय घेतले. भविष्यात देखील जनतेला जे हवे तेच आम्ही देऊ, असंही ते म्हणाले.
आम्ही घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने जनसागर रस्त्या रस्त्यावर चौका-चौका स्वागत करतोय शुभेच्छा, आशीर्वाद देत आहेत. आम्ही चुकीचा निर्णय घेतला असता तर यापैकी कोणीच आले नसते. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. राज्यातील जनतेला तेच हवं होतं. त्यांच्या मनात ते आहे तो विचार आम्ही बोलून दाखवलाय. जनतेच्या मनातला मुख्यमंत्री, आमच्या मनातला मुख्यमंत्री असे लोक बोलत आहेत. त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो. हे पाहिल्यानंतर समाधान वाटतं. हे सर्वांच्या नशिबात नसतं. त्यामुळे आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो राज्याच्या, लोकांच्या हिताचा आहे. म्हणून जी सत्ता मिळाली जी संधी मिळाली आहे त्याचा उपयोग आम्ही राज्याचा विकास करण्यासाठी करणार, असं ते म्हणाले.